नागपूर : साेनेगाव परिसरातील ममता साेसायटी येथे एकाचवेळी १४ श्वानांच्या संशयास्पद मृत्यूची हृदय हेलावून टाकणारी घटना रविवारी उघडकीस आली. जागाेजागी श्वानांचे शव पडले हाेते, ज्यामध्ये दाेन महिन्यांच्या पिल्लांचाही समावेश हाेता.
साेनेगाव परिसरात काही श्वान जागाेजागी मृतावस्थेत पडून असल्याची माहिती पशुप्रेमी स्वप्निल बाेधाने यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी पाेहोचून झालेल्या प्रकाराची शहानिशा केली. ममता साेसायटी परिसरात एक दाेन नव्हे तर १४ श्वान मरून पडले हाेते. याबाबत साेनेगाव पाेलिसांना माहिती देण्यात आली.
एवढ्या माेठ्या प्रमाणात श्वानांच्या मृत्यू झाल्याने घटनेची गंभीरता बघून पाेलिसांचा ताफा घटनास्थळी पाेहोचला. पाेलिसांनी पंचनामा करून श्वानांचे शव पाेस्टमार्टमसाठी पाठविले. पशुसंवर्धन विभागाच्या पशुचिकित्सकांनी श्वानांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे कारण रिपाेर्टमध्ये नमूद केले. त्यानुसार साेनेगाव पाेलिसांनी पशुअत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
बाेधाने यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून ३ व्यक्तिंद्वारे रस्त्यावरील श्वानांचा अमानुष छळ केला जात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या श्वानांमुळे रात्रीच्या सुमारास परिसरातील नागरिकांना असामाजिक तत्त्वापासून सुरक्षितता मिळत हाेती. त्यामुळेच असामाजिक तत्त्वांकडून श्वानांना मारले असल्याचा अंदाज बाेधाने यांनी व्यक्त केला.
पाेलिसांद्वारे यादृष्टीनेही तपास करत असून संशयितांचा शाेध घेत आहेत. दरम्यान, शिळे मांस खाल्ल्यानेही श्वानांचा मृत्यू झाला असावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात श्वानांचा मृत्यू झाल्याने पशुप्रेमींकडून राेष आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.