नागपूर : तीनपैकी दाेन लहान मुलींची प्रकृती अचानक खराब झाल्याने आईने दाेघींनाही मंगळवारी (दि. ५) सकाळी स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती एकीला मृत घाेषित केले, तर दुसरीवर प्रथमाेपचार करून नागपूरला रेफर केले. मात्र, तिचाही वाटेत मृत्यू झाला. या दाेन्ही चिमुकल्या सख्या बहिणींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याला पाेलीस अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे.
साक्षी फुलसिंग मीना (६) व राधिका फुलसिंग मीना (३) अशी मृत बहिणींची नावे आहेत. साक्षी व राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना ही मूळची बरबटेकडी, ता. कोंढा, जिल्हा बारा, राजस्थान येथील रहिवासी असून, पाटणसावंगी तिचे माहेर आहे. माधुरीचे फुलसिंग मीनासाेबत ११ वर्षांपूर्वी लग्न झाले. तिला साक्षी व राधिकासह पूनम (९) ही माेठी मुलगी आहे. आजाेबाचे (माधुरीच्या आईचे वडील) निधन झाल्याने ती तिन्ही मुलींना घेऊन पाटणसावंगी (ता. सावनेर)ला आई गंगाबाई भैयाजी काळे हिच्याकडे दाेन महिन्यांपूर्वी राहायला आली.
साक्षी व राधिकाची प्रकृती खराब झाल्याने तिच्या आईने दाेघींनाही सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्थानिक प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहा कापटे यांनी तपासणीअंती राधिकाला मृत घाेषित केले, तर साक्षीवर प्रथमाेपचार करून नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात रेफर केले. मात्र, गावापासून दाेन किमीपर्यंत जाताच वाटेत साक्षीचाही मृत्यू झाला. त्यामुळे तिला नागपूरला नेण्याऐवजी घरी परत आणले. दाेघींचाही एकाच वेळी मृत्यू झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. उपविभागीय पाेलीस अधिकारी अजय चांदखेडे, ठाणेदार मारुती मुळूक, सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर व दिलीप नागवे यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
पाेस्टमार्टम रिपाेर्टची प्रतीक्षा
राधिकाचा मृत्यू तिला दवाखान्यात नेण्याच्या किमान तीन तास आधी झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली, तर साक्षीचा मृत्यू सकाळी ७.३०च्या सुमारास झाला. दाेघींना जेवणातून विषबाधा झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मात्र, पूनम, माधुरी व गंगाबाईला ठणठणीत असल्याचे दिसून आले. त्यांच्या शरीरावर मारल्याच्या अथवा विषारी सरपटणाऱ्या प्राण्याच्या दंशाच्या खुणाही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण पाेस्टमार्टम रिपाेर्टमध्येच स्पष्ट हाेणार असल्याचे सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी सांगितले.