लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत धंतोलीतील एका मॉलच्या पार्किंगमध्ये आढळला. अभिषेक नरेंद्रसिंग बघेल असे मृताचे नाव असून तो वाठोड्यात राहत होता. २६ वर्षीय अभिषेक वैशालीनगरात मोबाईल शॉपी चालवत होता. त्याचे वडील नरेंद्रसिंग बघेल गुन्हे शाखेत सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत.
गुरुवारी दुपारी डोके दुखत आहे, असे सांगून औषध आणण्याच्या निमित्ताने अभिषेक घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही
त्याचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मिसिंगची नोंद करून त्याची शोधाशोध चालवली. दरम्यान शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने माहिती दिली. धंतोलीतील फॉर्च्युन मॉलच्या पार्किंगमध्ये मृतदेह पडून असल्याचे त्याने सांगितले. नियंत्रण कक्षाने धंतोली पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलीस उपायुक्त विनिता साहू यादेखील तेथे पोहोचल्या. मृत तरुणाच्या डोक्यावर मोठी जखम होती. वाठोड्यातील बेपत्ता तरुणाचे वर्णन मृत तरुणाशी जुळत असल्यामुळे धंतोली पोलिसांनी बघेल कुटुंबीयांना कळविले. ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तो अभिषेकच असल्याचे स्पष्ट झाले. अभिषेकची दुचाकी बाजूलाच पडून होती. त्याच्या दुचाकीचे हेडलाईट फुटलेले होते. अभिषेकला डोकेदुखीचा त्रास होता. त्याच्या डोक्याला जखम असल्यामुळे हा अपघात आहे की त्याची कोणी हत्या केली, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
अनेक संशयास्पद प्रश्न
वाठोडा ते धंतोली हे सुमारे पाच ते सात किलोमीटरचे अंतर आहे. एवढ्या दूरवर अभिषेक एकटा आला?
तो स्वतः आला की त्याला दुसऱ्या कुणी इकडे आणले?
सर्व काही बंद असताना तो पार्किंगमध्ये कसा गेला
येथील चौकीदार कुठे होता?
सध्या तो कुठे आहे,
असे संशय वाढविणारे अनेक प्रश्न असून, पोलीस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत.
सीसीटीव्ही ताब्यात
अभिषेकचा मृत्यू नेमका कसा झाला ते शोधून काढण्यासाठी पोलिसांनी मॉल तसेच आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढच्या काही तासात या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.