नागपूर : ‘सी-२०’च्या निमित्ताने देश-विदेशातील नारीशक्तीकडून महिला विकासासंदर्भात विविधांगी मंथन झाले असताना दुसरीकडे नागपुरातच बुरसटलेल्या विचारांचे एक काळे उदाहरण समोर आले. पैशांसाठी सासरच्या मंडळींनी महिला डॉक्टरचा अतोनात छळ केला व अखेर या प्रकाराला कंटाळून तिने आपला जीव दिला. महिला डॉक्टरचा मृत्यू संशयास्पद असून यामागे सासरच्यांचाच हात असल्याचा आरोप वडिलांना लावला आहे. या प्रकरणात तहसील पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अक्सा रईस सेख या होमिओपॅथीच्या डॉक्टर होत्या व २० मार्च रोजी त्या त्यांच्या घरीच गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्या. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी घरी सर्व जण होते. त्यामुळे पोलिसांनादेखील याप्रकरणात संशय आला. त्यांचे वडील रईस हुसैन शेख उर्फ हुसैन मासूम शेख (५८, संगमनेर, अहमदनगर) यांनी यासंदर्भात तक्रार केली व त्यातून सासरच्यांच्या छळाचे प्रकरण समोर आले. तिच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२१ मध्ये ऑनलाइन मॅट्रीमोनिअल साइटच्या माध्यमातून अक्सा यांचे लग्न नागपुरातील तहेरीम दानिश सिद्दीकी (३३, चंद्रलोक बिल्डींग) याच्याशी झाले. तहेरीमची आई रझिया सेवानिवृत्त शिक्षिका असून भाऊ ऐतराम हादेखील सोबत राहतो.
लग्नानंतर नागपूरला आल्यावर डॉ. अक्सा या एका इस्पितळासोबत काम करू लागल्या व त्यांची प्रॅक्टीस चांगली चालली होती. लग्नात त्यांच्या माहेरच्यांनी तीन लाख रोख व १३ तोळे सोने दिले होते. मात्र, काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी हुंड्यावरून त्रास देण्यास सुरुवात केली. डॉ. अक्सा यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्यानंतर हा प्रकार वाढत गेला. अगदी माहेरच्या मंडळींसमोर अश्लील शिवीगाळ करण्यापासून ते मारहाणीपर्यंत सासरच्या मंडळींची मजल गेली.
डिसेंबर २०२१ मध्ये मुलगा झाल्यानंतर सासरचे सुधारतील, अशी त्यांना आशा होती. मात्र, सासू, पती व दिराच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. घर बांधण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये आणण्याचा तगादा त्यांच्यामागे लावण्यात येत होता. १९ मार्च रोजी त्यांच्या सासरच्या लोकांनी १४ महिन्यांच्या मुलाला हिसकावले व त्यांना घराबाहेर काढले. हा प्रकार ऐकताच २० मार्च रोजी त्यांचे वडील नागपुरात पोहोचले. वडिलांनी सासरच्या मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केला व ते हॉटेलवर परतले. त्यानंतर तीन तासांतच त्यांना जावयाने फोन करून डॉ. अक्सा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळविले. जेव्हा वडील घरी पोहोचले तेव्हा डॉ. अक्सा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. रईस हुसैन शेख यांनी तहसील पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदविली व पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
...अन् वडिलांना मुलीचा मृतदेहच दिसला
रईस शेख यांच्या तक्रारीनुसार, २० मार्च रोजी ते जेव्हा मुलीच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर पती व सासूने तिला शिवीगाळ करत तिच्या तोंडावर पाणी फेकत अपमानित केले. वाद आणखी वाढायला नको, म्हणून शेख काही वेळासाठी बाहेर गेले आणि काही वेळातच त्यांना मुलीचा मृतदेहच पाहण्याची वेळ आली. माझी मुलगी डॉक्टर होती व १४ महिन्यांच्या मुलाला सोडून ती आत्महत्येचे पाऊल उचलणार नाही. सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली आहे का, याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.