लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत पार पडलेल्या सेंद्रीय शेती जागतिक परिषदेचा समारोप मंगळवारी झाला. जगभरातील विषमुक्त खाद्यान्नावर सेंद्रीय शेती हाच शाश्वत पर्याय ठरू शकतो. त्यासाठी विदेशातील कृषी विभाग, निमशासकीय संस्था यांनी एकत्र कार्य करावे. तसेच विदेशात सेंद्रीय शेतीमध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत समन्वय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.या तीन दिवसीय परिषदेमध्ये पाच देशाचे शास्त्रज्ञ तसेच भारतातील २७५ शास्त्रज्ञांनी भाग घेतला. संशोधकांनी सेंद्रीय शेतीचे संशोधन आणि अनुभव सादर केले. परिषदेचा समारोप १७ सप्टेंबरला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डॉ. बी. एम. भाले, अपेडाचे संचालक डॉ. ए. के. यादव, माफसुचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, संचालक डॉ. डी. पी. वासकर, तसेच स्वित्झर्लंडचे डॉ. अमरितबीर रायर, डॉ. चारू जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.डॉ. व्ही. एम. भाले यांनी अकोला विद्यापीठाचे सेंद्रीय शेतीमधील कार्य नमूद केले. ही परिषद विषमुक्त शेतीच्या दिशेने पहिले यशस्वी पाउल असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पातुरकर यांनी, सेंद्रिय पध्दतीने केल्यास जनावरांना पशुखाद्य सुध्दा सेंद्रीय मिळतील आणि पशु उत्पादने सुध्दा विषमुक्त उपलब्ध होतील असे नमूद केले.याप्रसंगी विविध देशातील तसेच राज्यातील संशोधकांना उत्कृष्ट कार्य आणि सादरीकरणासाठी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयोजन समितीचे सचिव डॉ. ए. एन. पासलावार, डॉ. व्ही. एस. खवले, डॉ. एस. आर. पोटदुखे, कोषाध्यक्ष डॉ. शांती पाटील तसेच डॉ. पी. आर. कडू, डॉ. डी. एम. पंचभाई आदी उपस्थित होते.