लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे व जागतिक उष्णतामानामुळे समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील व समुद्राच्या पातळीत वाढ झालेली आहे. तसेच सागरी वसतिस्थाने व संसाधनांत घट झालेली आहे. यामुळे मत्स्य संसाधनेच धोक्यात आलेली नसून या व्यवसायातील मच्छिमारांची उपजीविकादेखील धोक्यात आलेली आहे. सागरी जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी सागरी संसाधनांचा शाश्वत वापर करणे अत्यावश्यक आहे, असे मत कोची येथील केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्थेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. ग्रीनसन जॉर्ज यांनी व्यक्त केले. जागतिक महासागर दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय परिसंवादादरम्यान ते बोलत होते.
“आपले महासागर तापदायक बनत आहे काय? भारतीय महासागर संबंधी दृष्टिकोन" सदर विषयावर डॉ. ग्रीनसन जॉर्ज यांनी मार्गदर्शन केले.
मत्स्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी परिसंवादाचे आयोजन करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. मानवी उपक्रमाचा समुद्रावर होणारा परिणाम व जागतिक महासागराच्या शाश्वत व्यवस्थापनाची गरज याविषयी माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.डब्ल्यू. बोंडे, डॉ. प्रशांत तेलवेकर, राजीव राठोड व शैलेंद्र रेळेकर प्रामुख्याने उपस्थित होते.