नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने शिक्षण विभागाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी शासनामार्फत स्वाध्याय हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असून, आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील ४० हजार विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविला असून, राज्यात नागपूर विभागातील पाच जिल्हे यात पहिल्या दहात आहे.
कोरोना काळात मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शासनाने टीलीमीली, दीक्षा अॅप आदी माध्यमांचा वापर केला. यातून मुले कशी शिकत आहे, याचे मुलांनी स्वत:च मूल्यांकन करावे, यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून त्यांचा सराव करण्यात येत आहे. हा उपक्रम व्हॉट्सअॅप बेस आहे. नागपूर जिल्ह्यातील ४१ हजारावर विद्यार्थ्यांनी स्वाध्यायची नोंदणी केली आहे. वर्ग १ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. त्यांना प्रत्येक शनिवारी भाषा व गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. त्यासाठी त्यांना १ आठवड्याचा वेळ देण्यात येतो. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर ते चूक की बरोबर बघण्यासाठी लगेच उत्तरपत्रिका उपलब्ध होते. त्यातून त्यांनी काय चुका केल्या त्यांना दुरुस्त करण्यात येते. चुकले असेल तर उजळणीकरिता दीक्षा अॅपला कनेक्ट केले आहे. आतापर्यंत सहा स्वाध्याय झाले आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे त्यांच्या पालकांकडे ''''''''स्मार्ट फोन'''''''' नाहीत, तेही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाला नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्वात आघाडीवर चंद्रपूर जिल्हा आहे. यासाठी जिल्हानिहाय संपर्क अधिकारी ठेवले आहे. यात गोंदिया जिल्ह्यासाठी रवींद्र रमतकर, चंद्रपूर डॉ. रत्ना गुजर, वर्धा डॉ. मनिषा भडंग, भंडारा डॉ. सरिता मंगेश, गडचिरोली डॉ. सीमा पुसदकर, नागपूर उर्मिला हाडेकर या जबाबदारी सांभाळत आहे.
- स्वाध्यायमध्ये आघाडीवर असलेले पहिले १० जिल्हे
चंद्रपूर - ७८३१९
सातारा - ७०४२१
जळगाव - ६३८४४
नागपूर - ४१७२६
भंडारा - २६१७३
कोल्हापूर - २२५७०
अहमदनगर - १८०३
गोंदिया - १९८२६
नाशिक - १९५७९
गडचिरोली - १८२८५
- स्वाध्यायबेस उपक्रम अध्ययन निष्पत्ती आधारीत कार्यक्रम आहे. ही एकप्रकारे नियमित परीक्षा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य आदींचा या सक्रिय सहभाग असल्याने, नागपूर विभागातून याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
रवींद्र रमतकर, समन्वयक, स्वाध्याय उपक्रम