देशभक्तीची उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंदांची विचारधारा महत्त्वाची
- सुपर थर्टीचे आनंद कुमार : ‘युवा शंखनाद’ त्रैमासिक विचारपत्राचे विमोचन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्तमानात युवकांमध्ये देशभक्तीची भावना ढासळत चालली आहे. ही उणीव दूर करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांची विचारधारा सर्वदूर पोहोचणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी केले.
युवकांसाठी देशभक्तीची भावना प्रसारित करणाऱ्या आणि नवलेखकांना लिहिते करणाऱ्या ‘युवा शंखनाद’ या त्रैमासिक विचार पत्राचे विमोचन शनिवारी सीताबर्डी येथील सेवासदन सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आनंद कुमार आभासी माध्यमातून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर एनएडीटीचे असिस्टंट डायरेक्टर डॉ. ऋषी बिसेन, युवा शंखनादचे पालक प्रतीक दोषी व संयोजक धर्मेंद्र तुरकर उपस्थित होते. आभासी माध्यमाद्वारे विवेकानंद केंद्र, ओडिशाचे प्रांत संघटक रवी नायडू, रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते.
‘जहाँ चाह, वहा राह’ हे विचार लहानपणी वाचले आणि स्वतःतील क्षमतेचा परिचय होत गेला. पुढे आयुष्यात आलेल्या संघर्षाच्या समयी, स्वामीजींचे हेच विचार माझे मार्गदर्शक ठरले. आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे, तरुण रक्ताविषयी शंका नाही. मात्र, देश घडवायला गिधाडे नकोत तर काही करू इच्छिणाऱ्या रक्ताच्या युवकांची देशाला गरज आहे. तेव्हाच जेएनयूमधील प्रकारांना आळा बसेल. त्यासाठी हा शंखनाद महत्त्वाचा असल्याचे आनंद कुमार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता देशकर यांनी केले. प्रास्ताविक धर्मेंद्र तुरकर यांनी केले, तर आभार श्रेयस यांनी मानले.