लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिभेचे वरदान लाभलेल्या कलाकारांनी निर्माण केलेले कलाविश्व हा रसिक मनाचा उत्सवच असतो. प्रसार भारती, नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अशाच अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले. अविरत बरसणाऱ्या शितल पाऊस धारा आणि श्रोत्यांच्या कानामनाला रोमांचित करणाऱ्या अर्थभावपूर्ण संगीत शलाका, असा हा अनुभव होता.कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र प्रमुख (अभियांत्रिकी) प्रवीण कुमार कावडे, सहा संचालक डॉ. हरीश पाराशर, संगीत विभाग कार्यक्रम अधिकारी प्रकाश आत्राम, कार्यक्रम अधिकारी मृणालिनी शर्मा, माजी केंद्र संचालक गुणवंत थोरात, माजी सहायक संचालक चंद्रमणी बेसेकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात भोपाळ येथील कीर्ती सूद या मधूर आवाजाच्या गायिकेच्या गायनाने झाली. अंगभूत गायन क्षमता, विलक्षण दाणेदार स्वर व भावपूर्ण आवाज अशा वैशिष्ट्यांचे हे गायन होते. गायिकेने सुरुवातीला ‘काहे को बिसारा हरिनाम’ हे भजन सादर केले. यानंतर, सध्याच्या वातावरणाला अनुरूप असे गीत ‘बरसो मेरो द्वारे मेघा..’ व ‘तुम को चाहा तो खता क्या है’ व ‘लगता नहीं है दिल मेरा उजडे दयार में’ अशा खास लोकप्रिय गजल सादर करून, त्यांनी श्रोत्यांना जिंकले.यानंतर, मूळ इम्फाल येथील व सध्या नागपूर निवासी ख्यातनाम गजल गायिका लीना चॅटर्जी यांच्या अप्रतिम गायनाने श्रोत्यांशी हृदयी संवाद साधला. नाद सुरांच्या उद्यानात सहज विहार करण्याची दैवी प्रतिभा, लाजवाब शब्दस्वर विभ्रम, भावस्पर्शी गजलचे घरंदाज सादरीकरण असे हे मधूर गजल गायन होते. ‘हाये लोगो की करम फरमाईंयाँ बदनामियाँ मोहोबते रुसवाईयाँ’, ‘दिल के हर वक्त तस्सली का गुमा होता है, दर्द तो होता है मग जाने कहाँ होता है’, ‘मुझसे कितने राज है बतलाऊ क्या’ अशा या श्रुतीमधूर गजल होत्या.तद्नंतर, श्रोत्यांच्या खास प्रतीक्षा व अपेक्षेचे असे आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त गजल गायक बंधू उस्ताद अहमद हुसैन व उस्ताद मोहम्मद हुसैन, जयपूर यांच्या गायनाने अवघी मैफिल झळाळून गेली. मधाळ स्वर, गजलचे गहिरे शब्द व स्वर विभ्रमही गेहरा, सुरेल गमत व गळ्याला शास्त्रीय स्वरांचे रेशमी अस्तर, अशी ही अनुभूती होती. ‘उनसे कहने की जरूरत क्या है, मेरी ख्वाबोंकी हकिकत क्या है’, ‘मैं हवा हुँ कहाँ वतन मेरा, मौसम आऐंगे जाऐंगे हम तुम्हे भूला न पाऐंगे’ अशा सारख्या या सदाबहार गजल होत्या. प्रत्येक गजलच्या अर्थभावासह या गायकांनी सादर केलेला दिलकश शेर लाजवाब होता. तबल्यावर संदेश पोपटकर, राम खडसे, संवादिनीवर संदीप गुरमुले, व्हायोलिनवर शिरीष भालेराव, की-बोर्डवर आर.एफ. लतिफ, सतारवर अवनिंद्र शेवलिकर व उस्ताद नासिर खान यांनी साथसंगत केली. राधिका पात्रीकर व रिमा चढ्ढा यांनी निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढविली. श्रोत्यांचा उत्स्फूर्त व भरगच्च प्रतिसाद यावेळी मिळाला. एकूण, हुसैन बंधूंच्या गायनाने या मैफिलीला चार चाँद लागले.
स्वरगुंजन : मैं हवा हुँ कहाँ वतन मेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:14 AM
नागपूर आकाशवाणी केंद्रातर्फे अभिजात प्रतिभावान गायकांच्या गीत-गजल गायनाच्या ‘स्वरगुंजन’ या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडले.
ठळक मुद्देआकाशवाणी नागपूरतर्फे ‘गीत-गजल मैफिल’