लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : रुयाड (ता. कुही) येथे पिसाळलेल्या बेवारस कुत्र्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, कुत्र्यांच्या उपद्रवामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेत जखमी केले. शिवाय शेतकऱ्यांची पाळीव जनावरेसुद्धा कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली असून, १० काेंबड्या फस्त केल्या आहेत.
भागेश्वर लुटे, वंदना लुटे, दिलीप कामठे, शंभू गाेरबडे, प्रभा नखाते अशी जखमींची नावे असून, सर्वांना नागपूर मेडिकल येथे उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने भागेश्वर लुटे यांच्याकडील दाेन गाईंना चावा घेतला. त्यानंतर ईश्वर देशमुख यांच्या गाईला चावा घेत जवळच असलेल्या १० काेंबड्यांचा कुत्र्याने फडशा पाडला. हे पाहून भागेश्वर लुटे व त्यांची पत्नी वंदना यांनी कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना चावा घेत जखमी केले. त्यानंतर दिलीप कामठे, शंभू गाेरबडे व प्रभा नखाते यांनाही कुत्र्याने चावा घेतला. तसेच माराेती गेडेकर यांचा बैल, कवडू बनकर यांची गाय व चिंतामण सेलाेकर यांची म्हैस अशी एकूण सहा जनावरे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत. गुरांवर मांढळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. पिसाळलेल्या कुत्र्याच्या उपद्रवामुळे ग्रामस्थ भयभीत झाले हाेते. दरम्यान, मासे पकडण्याच्या जाळाच्या सहाय्याने कुत्र्यास पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पिसाळलेल्या कुत्र्याला ठार करून जमिनीत पुरल्याचे सरपंच नेहा ढेंगे यांनी सांगितले.