लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यातून धडा घेत किमान हिवाळ्यात विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप होईल, अशी अपेक्षा होती परंतु जानेवारी महिन्यानंतर थंडीचा जोर कमी होणार आहे. म्हणजेच थंडी संपल्यावर विद्यार्थ्यांना स्वेटर मिळण्याची आशा आहे. मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वेटर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना स्वेटर मिळण्याची शक्यता नाही.महापालिकेच्या नर्सरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्याधन कार्डाच्या माध्यमातून स्वेटरचे वाटप के ले जाणार आहे. २१ डिसेंबर २०१७ च्या स्थायी समितीच्या बैठकीत ६६.१४ लाखांच्या स्वेटर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर ई-निविदा काढण्यात आल्या. यात २३ कंत्राटदारांनी सहभाग घेतला. प्रतिनग २८३.४० रुपये ते ३७६ रुपये दराच्या निविदांचा समावेश आहे. ११ जानेवारीला निविदा उघडण्यात आल्या. यात मे. मनोहर साकोडे अॅन्ड ब्रदर्स नागपूर यांनी सर्वात कमी २८३.४० दराची निविदा सादर केली. नऊ पैकी तीन कंत्राटदारांनी साकोडे यांच्याच दराने स्वेटरचा पुरवठा करण्यास सहमती दर्शविली आहे. निविदा प्रक्रियेचा विचार करता महापालिकेच्या विद्यार्थ्यांना थंडी संपण्यापूर्वी स्वेटर मिळण्याची शक्यता नाही.
विद्यार्थ्यांना बूटही मिळाले नाहीमहापालिकेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेशासोबतच बूट वाटप केले जाते. परंतु यंदाच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना अद्याप बूट मिळालेले नाही. वेळेवर गणवेश वाटप न करता आल्याने शिक्षण विभाग चर्चेत आला होता. अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वारंवार धारेवर धरल्यानंतरही कारभारात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्र्थ्याना स्वेटर व बूट वाटप करण्याला विलंब होत असल्याची चर्चा आहे.