नागपूर : नागपूरची संत्रा बर्फी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, संत्रा बर्फी व इतर मिठाई तयार करण्याची प्रक्रिया अधिक हायजेनिक व्हावी. कमी वेळेमध्ये अधिक उत्पादन घेता यावे. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमधील ‘अष्टटेक’ स्टार्टअपने मिठाई कटिंग मशीन तयार केली आहे.
खाद्यपदार्थ उद्योग क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये उपयुक्त अशा नवनवीन उत्पादन तसेच मशीनची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता विद्यापीठाच्या अष्टटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने कमी वेळेमध्ये अधिकाधिक मिठाई कटिंग करण्याची मशीन तयार केली आहे.
विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रामधून संबंधित व्यवस्थापनाकडे मिठाई कटिंग मशीन पाठविण्यात आली आहे. अष्टटेक प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपमधील हर्षद वसुले, रोहित शेंडे व अक्षय इंगोले यांच्या पथकाने हे नवीन संशोधन इन्क्युबेशन केंद्राच्या मदतीने केले आहे.
एका मिनिटाला २४ किलो मिठाईची कटिंग
या मशीनद्वारे एका मिनिटाला २४ किलो मिठाईची कटिंग केली जाते. त्यामुळे यापूर्वी हाताने केले जात असलेल्या मिठाई कटिंगच्या श्रमाची देखील बचत होणार आहे.
विविध आकाराच्या तयार करता येणार मिठाई
ही मशीन ऑपरेट करण्याकरिता संगणक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. संगणक प्रणालीवर विशिष्ट आकाराची (साइज) कमांड द्यावी लागते. कच्चे साहित्य मशीनच्या एका ट्रेमध्ये ठेवल्यानंतर त्याचे दिलेल्या आकारानुसार तुकडे मशीनद्वारे केले जातात. संगणक प्रणालीद्वारे विविध आकाराची मिठाई या मशीनच्या माध्यमातून तयार करता येते.
डबल डेक मशीन
विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रामध्ये तयार करण्यात आलेली मिठाई कटिंग मशीन ही डबल डेक आहे. या मशीनमध्ये एकाच वेळेस मिठाई आडवी तसेच उभी कापली जाऊ शकते.
स्वच्छतेवर भर
तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी स्पर्श अत्याधिक कमी करून मशीनच्या माध्यमातून विविध उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. अष्टटेक या स्टार्टअपने देखील ही मशीन तयार करताना स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले आहे.