ऐन पोळ्याच्या दिवशी अमितने मृत्यूला कवटाळले : लकडगंजमध्ये शोककळा नरेश डोंगरे नागपूरगरिबीशी झुंजत, तिखट मिठाचा घास खात जगणाऱ्या होतकरू अमितने पोळ्याचा सण गोड करण्याचे स्वप्न रंगविले होते. आई अन् छोट्या बहिण भावालाही त्याने हेच गोड स्वप्न दाखवले होते. मात्र, आडमुठ्या प्रवृत्तीने त्याचा घात केला. आई, बहिण आणि छोट्या भावाला छान कपडे घेऊन घरात गोडधोड करण्याचे स्वप्न भंगल्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला. असंख्य आशा अपेक्षांसोबत आपल्याकडे नजर लावून बसलेल्या घरच्यांना आता घरी जाऊन काय सांगू, असा प्रश्न त्याला अस्वस्थ करून गेला. या अस्वस्थतेनेच त्याला गांधीसागर तलावावर नेले. अन्... ऐन पोळ्याच्या दिवशी एका गरिब कुटुंबाच्या वाट्याला आक्रोश आला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उघड झाल्यानंतर लकडगंजमधील अनेकांच्या तोंडचा घास कडू झाला. अमित दिलीप सिडाम (वय २०) हा तरुण लकडगंज, शांतिनगरात राहात होता. त्याला अंजली (वय १८) आणि सुमीत (वय १६) हे बहीणभाऊ. घरची स्थिती अतिशय बेताची. त्यात तीन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अमितची आई सुलोचनाबाई (वय ४५) सुपारी कारखान्यात काम करून कसाबसा कुटुंबाचा गाडा रेटण्याचा प्रयत्न करते. आईची होणारी ओढाताण आणि गरिबीमुळे स्वत:सोबतच बहीण-भावाची होणारी होरपळ ध्यानात घेऊन अमितने तीन महिन्यापासून एका ट्रेडिंग कंपनीत काम धरले. ४ हजार रुपये महिना त्याला पगार ठरला. बीकॉमच्या प्रथम वर्षाचे वर्ग करून तो कामावरही जाऊ लागला. मालकाने काम काढून घेण्यासोबतच अमितने काम सोडू नये म्हणून पगार अडवून ठेवण्याचे तंत्र अवलंबले. परिणामी अमितच्या मूळ उद्देशालाच तडा गेला. अस्वस्थतेतच काढले दिवस
गोड स्वप्न कडू झाले!नागपूर : दोन महिन्यांचा पगार रोखून ठेवणाऱ्या मालकाची आर्जव करीत तो अस्वस्थतेच दिवस काढू लागला. पोळा जवळ आला. यावेळी एकदम दोन महिन्यांच्या पगाराचे पैसे मिळेल. त्यातून आई, बहीण अन् भावाला नवीन कपडे घेऊ, घरात छान गोडधोड पदार्थ करू, असे मनोमन ठरवत अमितने आपल्या आईला आश्वस्त केले. पोळा २४ तासावर आला तरी मालक थकीत पगार द्यायला तयार नसल्याने तो रडकुंडीला आला होता. मात्र, स्वत:ची अवस्था लपवत तो त्याच्याकडे आशेने बघणाऱ्या आईला आश्वस्त करीत होता. शुक्रवारी दुपारी घराबाहेर पडताना अमितने ‘आज सर्व बरोबर करू‘,असे स्वप्न आईला दाखवले. ट्रेडिंग कंपनीत गेल्यानंतर मालकाला घरची स्थिती सांगून पोळ्यासाठी पैशाची गरज असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या पदरी निराशाच नव्हे तर अपमानही आला. त्यामुळे अमित कमालीचा व्यथित झाला. आपल्या पगाराकडे आशा लावून बसलेल्या आईला, बहिणीला अन् छोट्या भावाला आता काय सांगू, पोळ्याचा सण कसा साजरा करू, असे प्रश्न त्याला सतावू लागले. या प्रश्नांचे वादळ त्याला गांधीसागर तलावाच्या काठावर घेऊन गेले कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त पोळा साजरा करण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या सुलोचनाबाईजवळ अमितच्या अंत्यसंस्कारालाही पैसे नव्हते. शेजाऱ्यांना अमितच्या आत्महत्यामागचे कारण कळले अन् सुलोचनाबाईची अवस्था पाहून अनेक मायमाऊल्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अनेकांनी सण साजरा करण्याचे टाळले. अमितच्या रूपात असहाय मातेचा आधार गेला. बहीण अंजली (वय १८) आणि सुमितच्या पाठीवर वडिलाच्या रूपातील छाया धरणारा दूर झाला. गरीब सिडाम कुटुंबांचे स्वप्नच उद््ध्वस्त झाले. गणेशपेठ पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली. एका कुटुंबाला कधीही भरून न निघणारी जखम देणाऱ्या या प्रकरणात पोलीस आता काय भूमिका घेतात, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.