लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत. मध्यंतरी आलेला पाऊस आणि उन्हामुळे यंदा संत्र्याला चांगलाच बहार आला आहे. सध्या जवळपास दररोज २०० टन टेम्पो बाजारात येत असून विक्री वाढली आहे. पुढे आवक वाढण्याची शक्यता आहे.थेट बगिच्यातून संत्र्याची विक्रीमृग बहारात नागपुरी संत्र्याला मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक येथून प्रचंड मागणी असते. काही वर्षांपूर्वी काठमांडू, जम्मूलादेखील येथील संत्रा रवाना झाला होता. शेतकऱ्यांकडून कमिशन घेऊ नये, असे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे असल्याने अडतिया कमिशन व्यापाऱ्यांकडून घेतात. कमिशन टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडे धाव घेतली आहे. त्यांनी जानेवारीपासूनच बगिच्यातून खरेदी सुरू केली आहे. हजारो टन संत्र्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी सुरू आहे. वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कळमन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक कमी आहे. दररोज १५० ते १०० टेम्पोची आवक आहे. यंदा उत्पादन जास्त असल्याने भाव वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुढे आवक वाढेल, पण भाव वाढणार नाहीत, अशी माहिती फळ अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.नागपूर जिल्ह्यातून आवकमृग बहार संत्र्याची आवक काटोल, कोंढाळी, मोहपा, कळमेश्वर, सावनेर आणि लगतच्या परिसरातून सुरू आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमी आहे. यावर्षी वातावरणाने चांगली साथ दिल्याने पिकाची प्रतवारी उत्तम आहे. कळमन्यातून संत्रा दक्षिण भारत, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यात पाठविला जातो. यावर्षीही या राज्यांमधून मागणी वाढली आहे. नागपुरी संत्र्याला संपूर्ण देशात मागणी असते. आवकीच्या तुलनेत विक्रीही चांगली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.संत्रा गोड, गुणवत्ता चांगलीउत्पादक शेतकऱ्यांना महाऑरेंजतर्फे संत्र्याच्या गुणवत्तेबाबत नियमित प्रशिक्षण देण्यात येत असल्यामुळे मृग संत्रा गोड असून गुणवत्ताही चांगली आहे. यावर्षी विदर्भात ४ लाखांपेक्षा जास्त टन संत्र्याचे उत्पादन होणार आहे. त्याचा परिणाम म्हणून भाव वाढले नाहीत. ग्राहकांना आकार आणि दर्जानुसार खरेदीची संधी आहे. ठोकच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाव जास्त आहे. आंबियाच्या मृग बहार संत्र्याला जास्त मागणी असते.
नागपूरच्या ग्राहकांना गोड संत्र्याची मेजवानी : दररोज २०० टेम्पोची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 10:49 PM
कळमना बाजारात मृग संत्र्याची आवक सुरू झाली असून ग्राहकांना रसाळ संत्र्याची मेजवानीच आहे. आवकीसोबतच दरही आटोक्यात आहेत. कळमन्यात दर्जा आणि आकारानुसार प्रति टन १५ ते २० हजार रुपये भाव आहेत.
ठळक मुद्दे दर्जा व आकारानुसार भाव