नागपूर : कारागृहाच्या भिंतीआडचे जग तसे पाहिले तर भकास, निष्ठुर आणि त्राग्याने भरलेले असते. मात्र दिवाळीच्या निमित्ताने कारागृहातील वातावरणच बदलले होते. एरवी जेथे कैद्यांच्या किंकाळ्या व ओरडण्याचा आवाज येतो तेथे पहाटेच्या सुमारास मधुर स्वर निनादत होते. इतकेच नव्हे तर क्रूरकर्मा कैद्यांच्या मनातदेखील यामुळे कालवाकालव झाली व त्यांच्या ह्रद्यातील आठवणी सूरांच्या माध्यमातून बाहेर आल्या.
दिवाळी निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कैद्यांनीदेखील गीते सादर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सोमवारी पहाटे कैद्यांसाठी झालेल्या या आयोजनामुळे सर्वच सुखावले. हार्मोनी इव्हेंट्सच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले होते. आकांक्षा देशमुख, गुणवंत घटवाई, दिनेश उईके यांनी गीतांचे सादरीकरण केले. काही कैद्यांनीदेखील सुमधूर गीत सादर केले. अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्याप्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या अमित गांधी याने ‘खेळ मांडला’ या गीतातून आपल्या मनातील पश्चातापाचे भाव व्यक्त केले. दिवाळीत कुटुंबापासून दूर असल्याने अनेक कैदी हताश होते. मात्र या कार्यक्रमामुुळे त्यांच्यात उत्साह संचारला. यावेळी कारागृह अधीक्षक वैभव आगे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे, बी.आर.राऊत, विजय मेश्राम, पंचशीला चव्हाण इत्यादी उपस्थित होते.