लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंनी प्रशिक्षण घेतलेल्या रघुजीनगर येथील कामगार कल्याण मंडळाचा जलतरण तलाव कोरोनामुळे मागील आठ महिन्यापासून बंदच आहे. या तलावाचे फ्लोरिंग उखडले आहे. वॉटर फिल्टरही नादुरुस्त आहे. आजूबाजूच्या टाईल उखडलेल्या आहेत. तलाव बंद असल्याने या कालावधीत तलावाची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र दुरुस्तीचा प्रस्ताव कामगार कल्याण मंडळाच्या मुंबई येथील मुखयालयाकडे धूळखात पडून आहे. एक -दोन महिन्यात दुरुस्ती न झाल्यास उन्हाळ्यात या तलावाचा वापर करता येणार नाही. यामुळे जलतरणप्रेमीत नाराजी आहे.
नागपूर शहरात नासुप्र, कामगार कल्याण मंडळ, मेडिकल कॉलेज व मनपा असे चार जलतरण तलाव आहेत. कोरोनामुळे सध्या चारही तलाव बंद आहेत. कामगार कल्याण मंडळाच्या जलतरण तलावात दररोज २ ते ३ हजार जलतरण प्रेमी सरावासाठी येत होते. २००४ नंतर या तलावाची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती झालेली नाही. तलावाचे फ्लोरिंग उखडले आहे. वॉटर फिल्टर नादुरुस्त आहे. तलावात उडी मारण्याचा चबुतरा नादुरुस्त झाला आहे. परिसरातील टाईल निघालेल्या आहेत. अशा परिस्थितीत तलाव सुरू करण्याला परवानगी मिळाली तरी दुरुस्ती केल्याशिवाय हा तलाव सुरू करता येणार नाही. कामगार मंडळाने तलाव दुरुस्तीचा २५ लाखांचा प्रस्ताव कामगार कल्याण आयुक्तांकडे पाठविला आहे. परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.
दुरुस्ती न केल्यास आंदोलन
शहरात मोजकेच जलतरण तलाव आहे. कामगार कल्याण मंडळाच्या तलावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सोबतच कामगारांची मुले सरावासाठी येतात. परंतु हा तलाव दुरुस्तीला आला आहे. कोरोनामुळे तलाव बंद आहे. या कालावधीत तलाव दुरुस्त न झाल्यास उन्हाळ्यात त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे मंडळाने दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलावी, अन्यथा आंदोलन करू.
सतीश होले, नगरसेवक
आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला
२००४ सालापासून तलावाची दुरुस्ती झालेली नाही. तलावाचे फ्लोरिंग व वॉटर फिल्टर दुरुस्ती, परिसरातील टाईल दुरुस्तीचा २५ लाखाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे. आयुक्त या तलावाची पाहणी करणार आहेत. दुरुस्तीच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल.
नंदलाल राठोड, सहायक आयुक्त, कामगार कल्याण मंडळ नागपूर