लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कंपनीच्या मालमत्तेच्या विक्रीचा करार करून ७० लाख रुपये घेतल्यानंतर ती जागा परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक करणारा ठगबाज आरोपी गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५५, रा. रामदासपेठ) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो मुंबईत दडून बसला होता.
मनमोहन तिलकराज हिंगल (वय ६४) असे या प्रकरणातील तक्रारकर्त्यांचे नाव आहे. ते रामदासपेठेत राहतात. आरोपी कोंडावारने त्याच्या युनिक ऍग्रो प्रोसेसर इंडिया कंपनीची अमरावती मार्गावरील मालमत्ता विकण्याचा करार २०१२ मध्ये हिंगल यांच्यासोबत केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाचा ठराव करूनच ही मालमत्ता विकत असल्याचे कोंडावारने हिंगल यांना सांगितले होते आणि त्या ठरावाची प्रतही त्यावेळी हिंगल यांना दिली होती. त्यावर विश्वास ठेवून हिंगल यांनी कोंडावारला ७० लाख रुपये चेकने दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपी कोंडावारने त्याच्या कंपनीची मालमत्ता परस्पर दुसऱ्याला विकली. या वादग्रस्त व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कोंडावारला बरेचदा विचारणा केली; मात्र ९ वर्षापासून कोंडावार त्यासंबंधाने असंबंध माहिती देऊन फिर्यादीला टाळत होता. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रदीर्घ चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपी कोंडावारचा तेव्हापासून शोध घेत होते. तो मुंबईत दडून असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी त्याला १० मे रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा १५ मे पर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.
अनेकांची फसवणूक
अशाप्रकारे कोंडावारने अनेकांना लाखोंची टोपी घातली आहे. त्याच्याविरुद्ध नागपूर शहरात ५, तर ग्रामीणमध्ये एक असे ६ गुन्हे दाखल आहेत.