२७ रुग्णांचा मृत्यू : रोगाचा जोर होत आहे कमी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उन्हाळा संपायला आला असताना स्वाईन फ्लूची दहशतही कमी होत चालली आहे. नागपूर विभागात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे शंभर रुग्ण आढळून आले असून २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात लहान मुलांची संख्या सहा असून उर्वरित मृतांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन आठवड्यापासून या रोगाचे रुग्ण कमी झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात हा आजार वाढण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती नाजूक बनली होती. वाढत्या तापमानात स्वाईन फ्लूचा विषाणू तग धरत नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्याच्या आतापर्यंत या विषाणूची अनेकांना लागण झाल्याचे सामोर आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्वाईन फ्लू बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. रुग्णाची संख्या २०वर पोहचली आहे. तर नागपूर विभागात ही संख्या शंभरावर गेली आहे. यात नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात स्वाईन फ्लूमुळे झालेले बहुतांश मृत्यू हे खासगी रुग्णालयांमध्ये झाले आहेत. श्वसन रोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी ‘लोकमत’ला सांगितले, २०१० नंतर २०१२, २०१५ व आता २०१७ मध्ये सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले. या वर्षी पहिल्यांदाच उन्हाळ्यात मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आले. परंतु गेल्या दोन आठवड्यापासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे पावसाळ्यात याचे रुग्ण कमी दिसण्याची शक्यता आहे. परंतु तरीही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
स्वाईन फ्लूने गाठली शंभरी
By admin | Published: May 28, 2017 2:31 AM