लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नववर्षात स्वाईन फ्लूने खळबळ उडवून दिली आहे. नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ५४ रुग्ण व १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, लक्षणे दिसताच रुग्ण गंभीर होत आहे. काही घरांमध्ये तर कुटुंबेची कुटुंबे या रोगाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील बहुसंख्य मोठ्या रुग्णालयांमध्ये या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लू दारावर असताना आरोग्य विभाग याच्या जनजागृतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक २००९ मध्ये झाला. परंतु नऊ वर्षे झाली असताना शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक उपाययोजना किंवा स्वतंत्र यंत्रणा निर्माण झाली नाही. रुग्ण वाढले तरच शासकीय यंत्रणा जागी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. २०१८ मध्ये ६३ रुग्ण ११ मृत्यूची नोंद आहे. परंतु या वर्षीच्या पहिल्याच महिन्यात नागपूर शहरात ३७ रुग्ण व तीन मृत्यू तर नागपूर ग्रामीण भागात १७ रुग्ण सात मृत्यूची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पूर्वी स्वाईन फ्लूचे रुग्ण साधारण आठ ते १० दिवसांच्या लक्षणानंतर गंभीर व्हायचे. त्यांना व्हेंटिलेटर लागायचे. परंतु आता रोगाची लागण होऊन पाचव्या-सहाव्या दिवशीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे. सद्यस्थितीत शहरात असे चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामागे स्वाईन फ्लूच्या विषाणूने नवे रूप घेतले असावे, अशी शंका तज्ज्ञांमध्ये वर्तवली जात आहे.सप्टेंबरपासून रुग्णसंख्येत वाढवरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले, २०१७च्या तुलनेत २०१८ मध्ये स्वाईन फ्लूचे फार कमी रुग्ण आढळून आले. मात्र सप्टेंबर २०१८ पासून ते आतापर्यंत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एकट्या क्रिम्स हॉस्पिटलमध्ये सप्टेंबर ते आतापर्यंत २० रुग्ण आढळून आले आहेत. यातील सप्टेंबर महिन्यातील सहा रुग्ण आहेत.जानेवारी महिन्यात वातावरणात बरेच बदल झाले आहेत. पार चढत असताना अचानक पारा घसरला आहे असे चार-पाचवेळा झालेले आहे. वातावरणाचा हा बदल शरीरांवर पडतो. याच दिवसांत स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण साधारण आठव्या किंवा दहाव्या दिवशी गंभीर व्हायचे. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देणाऱ्या व्हेंटिलेटर यंत्राची गरज पडायची. परंतु आता दोन-तीन दिवसांत लागण झालेल्या रुग्णांना पाचव्या-सहाव्या दिवशीच व्हेंटिलेटरची गरज पडत आहे. हे धोकादायक असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.लक्षणे
- ताप (१०० अंश फॅरेनाईट किंवा त्याहून जास्त)
- खोकला
- सर्दी
- थकवा
- अंगदुखी
- डोकेदुखी
- घसा खवखवणे किंवा दुखणे
- थंडी भरून येणे
हे करा...
- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- खोकलताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
- भरपूर पाणी प्या
- पुरेशी झोप घ्या
- पौष्टिक आहार घ्या
जास्त कुणाला धोकापाच वर्षांखालील बालके, वय वर्षे ६५वरील वृद्ध व्यक्ती, गर्भवती स्त्रिया आणि ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कुमकवत आहे त्यांना स्वाईन फ्लूची लागण होण्याचा जास्त धोका असतो. मधुमेह किंवा दमा असलेल्या रुग्णांना, फुफ्फुस, हृदय, यकृताचा दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्यांनाही या रोगाची लागण सहज होऊ शकते.