लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. अशात एका गुंडाने साथीदाराच्या मदतीने तलवारीचा धाक दाखवत हंगामा केला. गुंडाच्या या आतंकाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार कुख्यात राकेश पाटील हा सतरंजीपुरा येथील किराडपुरा येथे राहतो. तो तडीपार आहे. असे असले तरी तो सतरंजीपुरा परिसरात फिरत असतो. सतरंजीपुरा वस्तीला सील करण्यात आल्याने किराडपुरा वस्तीतही बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहे. या बॅरिकेट्स जवळ परिसरातील पद्माकर लांजेवार यांनी आपली कार पार्क केली होती. अमन शेख व शिवम ढगे यांनी बॅरिकेट्स काढून पद्माकरच्या कारवर चढून रस्ता पार करीत होते. तेव्हा पद्माकर यांनी त्यांना हटकले. मात्र त्यांनी पद्माकरवरच हल्ला केला. वस्तीचे लोक पद्माकरच्या मदतीसाठी धावले. हे बघून अमन व शिवम पळून गेले. प्रत्यक्षदर्शीनुसार अमन व शिवम यांच्यासोबत राकेश पाटील अन्य चार पाच साथीदार तलवारी घेऊन वस्तीवर हल्ला करण्यासाठी सुभाष पुतळा चौकाकडून येत होते. त्यांना बघून सुभाष पुतळा चौकातील युवकसुद्धा एकत्र आले. याच दरम्यान कुणीतरी घटनेची लकडगंज पोलिसांना माहिती दिली. काही अंतरावरच पोलीस ठाणे असल्याने पोलीस दिसताच राकेश पाटील फरार झाला तर अमन व शिवम पोलिसांच्या हातील लागले. पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध पद्माकर यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.सतरंजीपुरा वस्तीत कोरोना संक्रमणाचा आकडा वाढला आहे. या वस्तीला अनेक दिवसांपासून सील करण्यात आले आहे. येथे लकडगंज पोलीस तैनात केले गेले आहे. लोकांनी बाहेर पडू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. असे असतानाही हल्ला होणे, तलवारी घेऊन फिरणे हा प्रकार घडल्यानंतरही पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सतरंजीपुरा वस्तीत यापूर्वी सुपारीचा कारखाना सुद्धा सापडला होता. या प्रकरणीही लक डगंज पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सील केलेल्या नागपूरच्या सतरंजीपुऱ्यात निघाल्या तलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:28 PM
कोरोनाच्या संक्रमणामुळे सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. अशात एका गुंडाने साथीदाराच्या मदतीने तलवारीचा धाक दाखवत हंगामा केला. गुंडाच्या या आतंकाने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
ठळक मुद्देगुंडाच्या आतंकाने नागरिक भयभीत : पोलिसांनी केली अदखलपात्र गुन्ह्याची नोंद