नागपूर : प्रेयसीला मिळविण्याच्या वादातून गुंडांनी तलवारीने ऐकमेकांवर हल्ला केल्याची घटना कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी रात्री कृष्णा धाम झोपडपट्टीत घडली. यात तिघे जखमी झाले असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आतिश उर्फ ऑस्टीन रॉबर्ट फ्रान्सिस (२२, कृष्णा धाम सोसायटी), सूरज वामनराव ठाकरे (२३, जरीपटका) आणि नौशाद फारुख शेख (२३, आझाद कॉलनी) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. ऑस्टीन आणि सूरज कुख्यात गुन्हेगार आहेत. ऑस्टीनविरुद्ध खून, खुनाच्या प्रयत्नासह अनेक गुन्हे दाखल आहेत. या घटनेचे कारण २३ वर्षांची युवती आहे. या युवतीसोबत सूरज ठाकरेची जुनी मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्टीन या युवतीच्या जीवनात आला. युवती त्याच्याजवळ गेली. ती ऑस्टीनसोबत कृष्णा धाम झोपडपट्टीत राहू लागली.
याची माहिती मिळताच सूरज संतप्त झाला. त्याला युवती ऑस्टीनसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याचे समजले. सूरजने ऑस्टीनच्या खुनाचा बेत आखला. त्याची माहिती मिळाल्यामुळे ऑस्टीन सतर्क झाला. मंगळवारी रात्री १ वाजता सूरज आपला साथीदार नौशाद शेख, टिपू उर्फ फहिम खान आणि रज्या उर्फ राजा हातात तलवार घेऊन ऑस्टीनच्या घरी पोहोचले. रात्री उशिरा दार वाजल्यामुळे ऑस्टीन सतर्क झाला. सूरजला पाहून त्यानेही तलवार काढली. खून करण्यासाठी ऑस्टीनने सूरज आणि त्याचा साथीदार नौशाद शेखवर हल्ला केला. सूरज आणि नौशाद जखमी झाला, परंतु आपल्याकडे येत असल्याचे पाहून ऑस्टीनच्या इतर दोन साथीदारांना सूरजने पकडले. तलवारीने हल्ला करून त्यांना जखमी केले. कृष्णाधाम झोपडपट्टीजवळ कोराडी पोलीस कर्मचारी तैनात होते. हल्ल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलीस येत असल्याचे पाहून जखमी अवस्थेतही सूरजने ऑस्टीनवर तलवारीने वार केले. पोलिसांनी त्वरित जखमींना रुग्णालयात दाखल केले. कोराडी पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
एका युवतीसाठी दोघे आपसात भिडले
‘एक फुल दो माली’च्या धर्तीवरील या प्रेमकथेत युवतीची भूमिका महत्त्वाची आहे. ती सूरजच्या अनेक दिवसांपासून संपर्कात होती. आपल्याला कर्जबाजारी केल्यानंतर युवतीने ऑस्टीनला हात पकडल्याचे सूरजचे म्हणणे आहे. घटनेच्या वेळी ती ऑस्टीनच्या घरातच होती. ऑस्टीनच्या कुटुंबीयांना युवतीचा या घटनेत हात असल्याची शंका आहे. पोलीस या दिशेने तपास करीत आहेत.
...............