लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणण्यात येते व दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी नागपूरसह विदर्भातून हजारो विद्यार्थी तेथे जातात. मात्र जर नामांकित संस्था नागपुरातच आल्या तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. नागपूरदेखील आता शैक्षणिक ‘हब’ होत असून ‘सिम्बॉयसिस’मुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण नागपुरातच घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ रविवारी पार पडला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.वाठोडा येथील ७५ एकर जागेत हे विद्यापीठ साकारणार असून येथे आयोजित या समारंभाला ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनुप कुमार, ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती एस.बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, हफिज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. नागपुरात ‘आयआयएम’, ‘ट्रीपल आयटी’, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, ‘नायपर’ यांच्यासारख्या राष्ट्रीय संस्था आल्या आहेत. ‘सिम्बॉयसिस’मुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आली आहे. या संस्थेला आम्ही नाममात्र दरात जागा दिली आहे. मात्र नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित राहणार आहेत व शुल्कामध्येदेखील १५ टक्क्यांची सूट असेल, अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली. देशात अनेक शिक्षणसंस्था आहेत. मात्र ‘सिम्बॉयसिस’ने शिक्षणाला मूल्यांची जोड देत एक आदर्श प्रस्थापित केला आहे. ‘सिम्बॉयसिस’ आणि एस.बी.मुजुमदार जेथे जातात तेथे प्रगती होते. नागपूरचा झपाट्याने बदल होत असून या संस्थेचे नागपूरच्या जडणघडणीत मौलिक योगदान असेल, असा विश्वास विजय दर्डा यांनी व्यक्त केला.शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर पाठविणे खर्चिक ठरते. मात्र आता नागपुरातील विद्यार्थ्यांना खरोखरच चांगली संधी उपलब्ध झाली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. नवा भारत घडवायचा असेल तर त्याचा मार्ग शिक्षणातूनच जाणार आहे. नागपुरातील ‘सिम्बॉयसिस’ला पुण्याची शाखा न समजली जाता, याला ‘सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, नागपूर’ असा खासगी विद्यापीठाचाच दर्जा मिळावा, अशी मागणी यावेळी एस.बी.मुजूमदार यांनी केली. गडकरींनीदेखील यासंदर्भात प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी डॉ.विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर डॉ.रजनी गुप्ते यांनी आभार मानले.
कुणाच्या पोटावर लाथ मारुन विकास नाहीपूर्व नागपुरातील विकास कामे करताना अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांची समस्या आली. मात्र यातून आम्ही मार्ग काढणार आहोत. कुणावरही अन्याय होणार नाही. कुणाच्या पोटावर लाथ मारून विकास करणार नाही, असे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे पैसे कमविण्याचे साधन नाही. त्याचा सेवेसाठी उपयोग करायला हवा. केवळ ‘पोस्टर्स’ लावून किंवा भाषणे देऊन कुणी मोठा होत नाही. केवळ काम व कर्तृत्वातूनच ओळख निर्माण होते, असेदेखील ते म्हणाले.