नागपूरच्या संविधान चौकात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:10 PM2018-04-09T13:10:50+5:302018-04-09T13:10:59+5:30
देशातील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा जपावा, शांतता कायम राहावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या सूचनेवरून आज सोमवारी देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - देशातील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा जपावा, शांतता कायम राहावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या सूचनेवरून आज सोमवारी देशभरात राज्य व जिल्हा पातळीवर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहर (जिल्हा)काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात सकाळी १० वाजेपासून लाक्षणिक उपोषणाला सुरूवात करण्यात आली. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व नागपूर ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.
भाजप सरकारने देशात चुकीचे निर्णय घेतले आहेत. देशात दंगली घडत आहेत. त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण सुरू असल्याचे विकास ठाकरे आणि राजेंद्र मुळक यांनी यावेळी सांगितले. या उपोषणाच्या माध्यमातून देशातील जनतेला सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम राहण्याचे आवाहन करीत आहोत, असेही या उपोषणात सहभागी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार,माजी मंत्री, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एनएसयूआय आणि शहर काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मात्र काँग्रेसमधील विलास मुत्तेमवार विरोधी गटाचे नेते या कार्यक्रमात सहभागी झालेले नाही. या कर्यक्रमातही पक्षातील गटबाजी दिसून आली.