लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील नागरिकांना मागील पाच वर्षापासून स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले जात आहे. कागदावर प्रकल्प तयार आहे. राजकीय नेत्यांनी त्याचे श्रेयही लाटले. मात्र, या प्रकल्पाअंतर्गत ज्या १,७३० एकर क्षेत्रावर विकास होणार होता, त्या क्षेत्रातील नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, ही वास्तविकता आहे.
तीन मुख्य मार्गांचे काम सुरू आहे. कळमना ते भरतवाडा रोड आणि भरतवाडा ते गॅस गोदाम दरम्यानच्या मार्गाची अवस्था वाईट आहे. रोजच अपघात घडतात. पावसाळ्यात झालेल्या अपघातामध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या कार्यालयावर जाऊन रोष व्यक्त केला, पण मिळाले काय, तर निव्वळ आश्वासन ! अपूर्ण रस्ता कामांसंदर्भात बाजू समजून घेण्यासाठी प्रकल्पाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांना दोनदा मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.
...
नुकसानभरपाई मिळतेय किस्तीने !
पारडी, भरतवाडा, पुनापूर, भांडेवाडी या भागातील १,७३० एकर जमीन स्मार्ट सिटीसाठी प्रस्तावित आहे. प्रकल्पात घरे तुटणाऱ्यांना नुकसानभरपाईचे प्रावधान आहे. मात्र तीसुद्धा किस्तीने मिळत आहे. मार्गाच्या कामासाठी १५ ते २० लोकांची घरे तोडण्यात आली. दोन किस्ती मिळाल्या, तिसऱ्या किस्तीची प्रतीक्षा आहे. रिकाम्या जमिनीचा ४० टक्के भाग प्रकल्पांतर्गत अधिग्रहित करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. मात्र त्या बदल्यात कसलाही मोबदला दिला जात नाही, ही यातील मोठी अडचण आहे.
...
रस्ते अपूर्ण, नुकसान भरपाईही नाही
लकडगंज झोनचे सभापती राजकुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पातील कळमना ते भरतवाडा रोड आणि भरतवाडा रोड ते गॅस गोदामापर्यंचे काम दीड वर्षानंतरही कासवगतीने सुरू आहे. यामुळे अपघात होत आहेत. नागरिक त्रस्त आहेत.
...
प्रकल्पाची सद्यस्थिती
- स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘सुरक्षित शहर’ या उपक्रमातून शहरातील मुख्य चौकांमध्ये ३,५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
- ५२ किलोमीटरपैकी १२ किलोमीटरचे काम दीड वर्षापूर्वी सुरू झाले असले तरी कामात बरीच कासवगती आहे.
- हाऊसिंग स्कीमचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीदरम्यान करण्यात आले, मात्र कामाला अजूनही वेग नाही. या कामावर २२० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे.
- स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ६५० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.