भिवापूर : बंद झालेले दारू दुकान सीमावर्ती भागात उघडून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध पुरवठा करण्याचा प्रकार बिनबोभाट सुरू आहे. राजकीय वरदहस्तातून सुरू असलेला हा गोरखधंदा गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाला. दरम्यान ‘त्या’ दुकानावर यंत्रणेने आता वॉच ठेवला आहे. अटकेतील आरोपीच्या कबुलीजबाबावरून विक्रेता व खरेदीदार या दोन्हीवर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय मार्गापासून ५०० मीटर अंतरावरील देशी व विदेशी दारूची दुकाने मध्यंतरी बंद करण्यात आली होती. स्थलांतरणाच्या निकषावर नंतर ही दुकाने सुरू करण्यात आली. हीच संधी साधत सदर दारूचे दुकान भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी फाटा येथे भाड्याच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले. या दुकानापासून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अवघ्या १ कि.मी. अंतरावर आहे. दोन महिन्यापूर्वीच हे दुकान सुरू झाले. त्यानंतर लागलीच दुकान मालकाने अवैध दारू वाहतुकीचा गोरखधंदा सुरू केला. हा सर्व काळा कारभार मध्यरात्री सुरू होता. त्यामुळे स्थानिक पोलीस कारवाईच्या दृष्टीने या दुकानावर वॉच ठेवून होते. अशातच गत ४ मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने या दुकानातून चंद्रपूर जिल्ह्यात अवैध वाहतूक होणाऱ्या ७८ पेट्या देशी दारूचा साठा जप्त केला. यात वाहन चालक संदीप मेश्राम (३०) रा. भिसी याला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने सदर दारू ही सालेभट्टी फाट्यावरील दुकानातून घेतल्याचे सांगितले. पुढे हा दारूसाठा भिसी (जि. चंद्रपूर) येथील आकाश पाटील याच्याकडे पोहचता करायचा होता, असेही त्याने सांगितले. त्यामुळे भिवापूर पोलिसांनी यात आता आकाश पाटीलविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या अटकेनंतर दारूचा अवैध पुरवठा करणाऱ्या दुकान मालकाविरुद्धही कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महिलांनी केली तक्रार
स्थानिक ग्रामपंचायतीला कुठलीच कल्पना नसताना दोन महिन्यापूर्वी सालेभट्टी फाट्यावर अचानक दारूचे दुकान सुरू झाले. त्यामुळे येथील महिलांनी सदर दुकान कायमचे बंद करा किंवा तालुक्याबाहेर स्थलांतरित करा, या आशयाचे निवेदन संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे आता गुन्हे शाखेची कारवाई आणि महिलांची तक्रार याकडे संबंधित विभाग कुठल्या नजरेतून पाहते, हा प्रश्नच आहे.
याकडेही लक्ष द्या!
सध्या दोन दुकानातून मोठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध वाहतूक सुरू आहे. वर्षभरापूर्वी दिवसाला १० पेट्याची विक्री करणाऱ्या दुकानातून आता दिवसाला एक हजार पेट्यांची विक्री होत आहे. त्यामुळे दारूच्या एवढ्या पेट्या चालल्यात कुठे, हा प्रश्न आहे. यात उमरेड शहरातील एक तरुण (अन्ना) मद्यसम्राटाची भूमिका वठवीत आहे. त्याच्यावर एका बड्या नेत्याचा हात असल्याने यंत्रणाही हतबल झाली आहे.
कसा पकडणार दारूसाठा?
या दोन दारूच्या दुकानापैकी एका दुकानात मोठे गौडबंगाल आहे. दुकानाच्या नावावर पुरवठा होणारा दारूसाठा दुकानातून न जाता थेट नागपूर व बुटीबोरीच्या एजन्सीतून जात असल्याचे कळते. त्यासाठी हा मद्यसम्राट आपल्या दुकानाच्या नावे टिपी घेऊन एजन्सीतून माल खरेदी करतो. त्यानंतर हा माल दुकानात न पोहचता थेट उमरेड-भिसीमार्गे चंद्रपूर जिल्ह्यात पोहचविला जातो. त्यामुळे हा माल पकडायचा कसा, हा प्रश्नच आहे.