नागपूर : आपसातील वैमनस्यातून एका तडीपार गुंडाला आरोपीने कोयत्याने सपासप वार करून ठार केले. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नाईकनगरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खुनानंतर आरोपीने अजनी ठाण्यात आत्मसमर्पण केले असून शहरात सुरु झालेली खुनांची मालिका रोखण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
सुरज उर्फ बिहारी अमीर महतो (२५, रा. बालाजीनगर, मानेवाडा रोड, नागपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर बिपीन कुमार गुप्ता (२० रा. नाईकनगर) असे आरोपीचे नाव आहे. सुरज हा तडीपार आरोपी आहे. त्याला वर्धा जिल्ह्यात सोडण्यात आले होते. आरोपी बिपीन आणि मृतक सुरज प्रवृत्तीचे होते. मागील काही दिवसांपासून मृतक सुरज आणि बिपीनमध्ये आपसात वाद सुरु होता.
बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते मानेवाडा रिंग रोडवरील नाईकनगरचा फलक लावलेल्या ठिकाणी भेटले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादात आरोपी बिपीनने आपल्याजवळील कोयत्याने सुरजवर वार केला. वार केल्यामुळे सुरज रक्तबंबाळ झाला. त्याने आपली पल्सर गाडी घटनास्थळीच सोडून बाजुच्या गल्लीत पळ काढला. त्यानंतर तो जीव वाचविण्यासाठी शाम शिरसाठ यांच्या घरात शिरला. परंतु आरोपी बिपीनही सुरजच्या पाठोपाठ शिरसाठ यांच्या घरात शिरला आणि त्याने पुन्हा कोयत्याने वार करून सुरजला संपविले.
सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाला. या घटनेची माहिती एका ऑटोचालकाने मानेवाडा चौकातील वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक कमलकांत रोकडे, संध्या ढोके यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता सुरज रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्यांनी लगेच नियंत्रण कक्षाला फोन केला आणि त्यानंतर झोन ४ चे उपायुक्त विजयकांत सागर आणि अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला.