पर्यटनाला चालना : जागतिक सल्लागारांसाठी विनंती प्रस्ताव जारीलोकमत विशेषसंजय रानडे नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जागतिक दर्जाचे ‘इको टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून विकसित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सल्लागार नियुक्तीसाठी जागतिक पातळीवरील नामांकित संस्था, कन्सलटन्सी, फर्म व कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव (आरपीएफ) मागविण्यात आले आहेत. यात जागतिक पातळीवर इको टुरिझम विकसित करण्याचा अनुभव असलेल्या संस्था किंवा कंपनीला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. संबंधित संस्था वा कंपनीकडून ‘इको टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून विकसित करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करू न घेण्यात येणार आहे. ताडोबा येथील कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी विनंती प्रस्ताव (आरपीएफ) जारी करण्यात आले. संबंधीत डीपीआरमध्ये प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्यासह प्रकल्पाचे डिझाईन व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचेही नियोजन राहणार आहे. याशिवाय ताडोबा ‘इको टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून पूर्णपणे विकसित होईपर्यंत त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित संस्था वा कंपनीची राहणार आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ताडोबासह मुंबई येथील संजय गांधी नॅशनल पार्क व गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचा केनिया येथील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हच्या धर्तीवर ‘टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. शिवाय त्यासाठी १९१ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. ताडोबा-अंधारी वाघांसाठी जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे येथे पर्यटन विकासासाठी भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत.
ताडोबा होणार ‘इको टुरिझम डेस्टिनेशन’
By admin | Published: July 18, 2015 2:55 AM