योगेश पांडे
नागपूर : अंगाखांद्यावर खेळणाऱ्या ज्या मुलांच्या बाललीला पाहिल्या त्यांचे निपचित पडलेले मृतदेह पाहून सर्वांच्या नजरा रविवारी रात्री पाणावलेल्या होत्या. दिवसभर चिवचिव करणारी तौफिक आणि आलियाला गमावल्यानंतर आई अफसाना आणि वडील फिरोज यांचा आक्रोश थांबता थांबत नव्हता. तर आफरीनच्या वडिलांची नजर तिच्या आठवणींमध्ये शून्यात हरविली होती. खेळता खेळता झालेल्या तीन चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर पाचपावलीतील फारूखनगरमधील प्रत्येक घरात शोकाकुल वातावरण होते. नियतीने केलेल्या क्रूर थट्टेसमोर सर्वच हतबल होते आणि सर्वांचा एकच सवाल होता, ‘इन मासूमों का क्या कसूर था?’
पाचपावलीतील फारूखनगरमध्ये रविवारी रात्री शोककळा पसरली होती. शनिवारपासून गायब झालेल्या तौफिक, आलिया व आफरीन यांचे मृतदेहच आढळल्याने विविध प्रश्नांना ऊत आला होता. मात्र त्याहून महत्त्वाचे आईवडिलांना आधार देणे जास्त गरजेचे होते. तेच काम प्रत्येक जण आपापल्या परीने करत होता.
नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह
अन् ते पोटच्या गोळ्यांसोबतचे अखेरचेच जेवण ठरले
तौफिक आणि आलियाचे आजोबा मुस्तफा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड ते दोन वाजता दोघेही त्यांच्या आईसोबत जेवले व घरासमोरच खेळत होते. त्यांनी समोरील रेती उचलून आणली व गच्चीवर खेळत होते. रेतीचा कचरा टाकायला म्हणून ते खाली गेले आणि त्यानंतर बेपत्ताच झाले. त्यांचे ते अखेरचे जेवण ठरले. हे सांगताना मुस्तफा यांचे अश्रू अनावर होत होते. तौफिक व आलियाचा मोठा भाऊ नऊ वर्षांचा आहे, तर एक बहीण वर्षाचीदेखील झालेली नाही.
शहरातील ८० ‘स्क्रॅप’वाल्यांकडून रात्रभर शोध
तीनही मृतक चिमुकल्यांचे वडील हे मूळचे उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील असून ते ‘स्क्रॅप’ विक्रीचे काम करतात. मुले हरविल्याची माहिती मिळाली तेव्हा फिरोज खान व ईरशाद खान हे दोन्ही वडील कामावर होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी आजूबाजूच्या बगीच्यांमध्येदेखील शोध घेतला. पोलिसांचा शोध सुरूच होता. मात्र हातगाडीवर ‘स्क्रॅप’ विकत घेणाऱ्या सुमारे ८० जणांकडून रात्रभर शहरातील विविध भागात शोधमोहीम सुरू होती. प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात होता. रविवारी दुपारीदेखील मुलांचे फोटो घेऊन शोध घेतला, अशी माहिती फिरोज खान यांचे बंधू शाहबाज खान यांनी दिली.
अगोदर लहान बहीण, आई गेली अन् आता आफरीनदेखील हिरावली
आफरीनचे वडील इर्शाद खान हे तर पोलिसांचा पंचनामा शून्यातच पाहत उभे होते. त्यांची पत्नी रिझवाना हिचा तीन वर्षांअगोदर क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता, तर आफरीनची लहान बहीणदेखील सात महिन्यांची असताना दगावली होती. त्यानंतर इर्शाद यांनी दुसरा विवाह केला असला तरी त्यांचा जीव आफरीनमध्येच होता. तिला ते या वर्षीपासून शाळेतदेखील पाठविणार होते. शनिवारी तिला निरोप देऊन ते कामावर गेले. घरी परत आल्यावर त्यांना आफरीन दिसली नाही व त्यानंतर तीनही मुले गायब झाल्याची बाब समोर आली. माझी आफरीन कधीच परत येणार नाही हा विचारच सहन होत नसल्याचे ते वारंवार म्हणत होते.
कार्यक्रमामुळेकार ठेवली आणि तीच काळ ठरली
ज्या कारमध्ये तीनही चिमुकल्यांचा मृतदेह आढळला ती कार एका गॅरेजमधील असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. संबंधित गॅरेजच्या मालकाच्या घरी एक कार्यक्रम होता व त्यामुळे ती कार घराच्या समोर पार्क न करता मागे आणून ठेवण्यात आली होती. शनिवारी लोकांनी कारमध्ये टॉर्च मारून पाहिला होता. मात्र काच काळी असल्यामुळे फारसे काही दिसले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे जिथे कार उभी होती त्याच्या जवळच चहाची टपरी आहे व ती दिवसभर उघडी असते. तर संबंधित गल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. अशा स्थितीत कुणालाही मुले दिसली नाहीत किंवा कारच्या काचा ठोठावल्याचा आवाज कसा आला नाही, असा प्रश्न नातेवाईक उपस्थित करत होते.