षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा : मान्यवरांनी दिली कामाची पावतीनागपूर : धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांचे आयुष्य संघर्षरत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल विकले, ट्युशन क्लासेस घेतले. कामाची लाज बाळगली नाही. परिश्रमातून यशाचा एक एक टप्पा गाठला. ते मित्र व माणसांशिवाय राहू शकत नाही. कुशल संघटक असलेले तायवाडे यांनी नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड केली. त्यामुळेच त्यांना असामान्यत्व मिळाले, अशा शब्दात मान्यवरांनी डॉ. बबनराव तायवाडे यांचा गौरव करीत त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची पावती दिली.डॉ. बबनराव तायवाडे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारोह रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात पार पडला. अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके होते. मंचावर आयोजन समितीचे प्रमुख गिरीश गांधी, अनंतराव घारड, आ. सुनील केदार, आ. प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, अनिल अहीरकर, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष टी.ए. शिवारे, बलविंदर सिंग, माजी आ. दीनानाथ पडोळे, डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. बबनराव तायवाडे व पत्नी डॉ. शरयू तायवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, ६० किलो वजनांचा पुष्पहार, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रमेश बोरकुटे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला मातोश्री लीलाताई तायवाडे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले, डॉ. तायवाडे यांची षष्ट्यब्दीपूर्ती साजरी करण्यास आपण घाई केली. कारण, यामुळे आज लोकांना तायवाडे हे ६० वर्षांचे झाल्याचे कळले. आज आपण त्यांचा बायोडाटा बारकाईने वाचला. वाचून आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्या पदव्या, एवढ्या संस्थांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला आपण आजवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याप्रमाणे कामे सांगत आलो, ही चूक केली असे वाटू लागले आहे. कार्यक्रमाला जमलेली गर्दी ही बबनरावांतील कुशल संघटकाने केलेल्या कामाची पावती आहे. पत्नी डॉ. शरयू यांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे हे होऊ शकले, असेही ते म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनी डॉ. तायवाडे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत काँग्रेसचा सच्चा शिपाई म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. तायवाडे हे शिवाजी शिक्षण संस्थेत दडलेला हिरा आहेत. अहंकारीवृत्ती नसल्यामुळे तायवाडे यांच्याशी लोक जुळत गेले, अशा शब्दात अॅड. अरुण शेळके यांनी तायवाडे यांचा गौरव केला. गिरीश गांधी प्रास्ताविकातून म्हणाले, तायवाडे हे कुशल संघटकासोबतच करुणामय मन असलेले व्यक्ती आहेत. विधान परिषदेची निवडणूक तोंडावर असताना नितीन गडकरी यांचा अपघात झाला होता. त्या वेळी गडकरी आपल्या विरोधात प्रचाराला फिरू शकणार नाही, हे जाणून तायवाडे यांनी स्वत:हून माघार घेतली होती, अशी आठवण गांधी यांनी सांगितली. माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे यांनी तायवाडे हे सकारात्मक विचार करणारी व्यक्ती असून, विद्यापीठाला समोर नेण्यासाठी त्यांनी सतत धडपड केल्याचे सांगितले. अतुल लोंढे, प्रदीप बोरवडे, अनिल अहीरकर यांनी तायवाडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत ते सर्वांसाठी आधारवड ठरल्याचे सांगितले. आ. सुनील केदार व आ. प्रकाश गजभिये यांनीही तायवाडे व त्यांच्या पत्नी डॉ. शरयू यांच्या कार्याचा गौरव केला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. या वेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. सुनील शिंदे, अशोक धवड, अविनाश वारजूरकर, सेवक वाघाये, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, सुरेश भोयर, किशोर मोहोड, किरण पांडव, गिरीश पांडव आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या गझलांचा कार्यक्रम पार पडला.(प्रतिनिधी)
तायवाडेंनी सामान्यांसाठी लढत असामान्यत्व मिळविले
By admin | Published: February 15, 2016 2:59 AM