नागपूर : बाबा ताजुद्दीन (र.अ.) एक महान व क्रांतिकारी संत हाेते. त्यांनी नेहमी धार्मिक एकता आणि मने जाेडण्याचा संदेश दिला. येथे येणारे लाखाे लाेक याच भावनेने प्रेरित हाेऊन साैहार्द, एकता आणि अखंडतेचा झेंडा फडकवीत आहेत, असे प्रतिपादन लाेकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटाेरियल बाेर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
विजय दर्डा यांनी बुधवारी रात्री बाबा ताजुद्दीन यांच्या शंभराव्या सालाना ऊर्सनिमित्त ताजाबाद दरगाह येथे चादर चढविली. यावेळी बाेलताना त्यांनी सर्व भाविकांचे शंभराव्या सालाना ऊर्सनिमित्त अभिनंदन केले. ते म्हणाले, बाबा ताजुद्दीन कधी जाती, धर्म, पंथ, रंगभेदावर विश्वास ठेवत नव्हते. त्यांच्या शताब्दी महाेत्सवानिमित्त येथे पाेहचून डाेके टेकवताना सर्वांना गाैरवान्वित वाटत आहे. त्यांचा आशीर्वाद घेतल्याने एक ऊर्जा प्राप्त हाेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दर्डा म्हणाले, महान संत बाबा ताजुद्दीन या शहराचे आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. देश-विदेशातील लाेक येथे येऊन नमन करतात. लता मंगेशकर येथे आल्या हाेत्या, त्यावेळी बाबांचे दर्शन करण्याची इच्छा आपल्याकडे व्यक्त केली हाेती. पाकिस्तानचे महान गझलकार गुलाम अली साहेबांनीही नागपूरला आल्यानंतर हीच इच्छा व्यक्त केली हाेती. माझे वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा बाबुजी, माजी मंत्री एनकेपी साळवे आणि वसंत साठेसुद्धा नेहमी येथे येऊन आशीर्वाद घ्यायचे. त्यांना येथे आल्यानंतर ऐक्य, समाजातील साैहार्द आणि अखंडतेची भावना जागृत करण्याची प्रेरणा मिळत हाेती.
विजय दर्डा यांच्या मते बाबांचा शताब्दी महाेत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव एकत्रित साजरा करणे, हा आनंदी संयाेगच आहे. एकता हीच देशाची ओळख आहे आणि बाबांनी हीच ओळख मजबूत केली आहे. आपला राष्ट्रध्वज तिरंगासुद्धा आपल्या सर्वांना एका सूत्रात बांधताे, अशी भावना दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली.
बाबांच्या दर्शनासाठी आंमत्रणाची गरज नाही
विजय दर्डा म्हणाले, ताजुद्दीन बाबा ट्रस्टचे चेअरमन प्यारे खान यांनी त्यांच्या मेहनतीने उद्याेग क्षेत्रात ओळख निर्माण केली. ते लाेकांसाठी प्रेरणा आहेत. प्यारे खान व इतर ट्रस्टींनी त्यांना येथे येण्याचे आमंत्रण दिले हाेते. मात्र आमंत्रण दिले नसते तरी येथे येऊन बाबांचा आशीर्वाद घेतलाच असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शताब्दी वर्षानिमित्त येथे येणारे लाखाे अनुयायी प्रेम, बंधुभावाचा संदेश घेऊन परत जातील आणि बंधुभाव स्थापन करतील. महान संत ताजुद्दीन बाबांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.