चंदू कावळे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : साधारणत: २५ वर्षांपूर्वी टाकळघाट येथे बसस्थानकावर प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी ‘प्रवासी निवारा’ तयार करण्यात आला होता. मात्र त्या प्रवासी निवाऱ्याची स्थिती सध्याच्या घडीला अत्यंत दयनीय झाले आहे. प्रवासी निवारा हा दारुड्यांचा अड्डा झाला आहे. एवढेच काय तर प्रवासी निवाऱ्याच्या भिंतीला तडे गेले असून ती भिंत जाहिरातबाजीचे केंद्र झाले आहे. टिनपत्रे कुजलेली आहेत. या प्रवासी निवाऱ्याऐवजी सुस्थितीतील बसस्थानक टाकळघाट येथे होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा टाकळघाट येथील नागरिकांनी केली आहे.टाकळघाट येथे प्रसिद्ध विक्तुबाबा देवस्थान, शाळा - महाविद्यालय, शासकीय - निमशासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. पंचतारांकित औद्योगिक परिसराला लागून असलेल्या या गावातून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा सुरू असते. यासाठी गावासाठी साधारणत: २५ वर्षांपूर्वी तत्कालीन आ. रमेश बंग यांनी प्रवासी निवारा मंजूर करून निधी दिला. त्यानंतर लगेच काही दिवसांनी टाकळघाटमध्ये प्रवासी निवारा अस्तित्वात आला. त्यामुळे उन्हाळा, पावसाळ्यात प्रवाशांची सोय झाली. मात्र त्यानंतर देखभाल दुरुस्तीअभावी प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली.प्रवासी निवाºयाची टिनपत्रे कुजलेली आहे. भिंतींना तडे गेलेले आहेत. तेथे दारुड्यांचा वावर असतो. त्यामुळे प्रवासी त्या प्रवासी निवाऱ्यापासून दूरच राहतात. एवढेच काय तर या प्रवासी निवाऱ्यापुढेच आॅटो उभे राहात असल्याने तेथे जाणे शक्य नसते. परिणामी प्रवाशांची उन्हाळा आणि पावसाळ्यात प्रचंड गैरसोय होते.परिसरात खापरी (मोरे), खैरी (खुर्द), मांडवा, गोंडवाना, पिपरी, भानसुली, किन्ही, भीमनगर, खापरी (गांधी) अशी अनेक गावे असून त्यांना कोणत्याही कामासाठी टाकळघाट येथे यावे लागते. नागपूर किंवा अन्य ठिकाणी जायचे असल्यासही टाकळघाटशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. मात्र टाकळघाट येथे त्यांना प्रवासी निवाºयाबाहेर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. बसस्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शौचालय नाही. त्यामुळे प्रचंड गैरसोय होते. टाकळघाट येथून बरेचसे विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. त्यांनाही प्रवासी निवाऱ्याऐवजी रस्त्यावर अथवा एखाद्या दुकानाच्या शेडखाली उभे राहावे लागते. येथे येणाºया भाविकांनाही त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देता सुस्थितीतील बसस्थानक होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया टाकळघाटमध्ये व्यक्त होत आहे.
ग्रामसभेत ठराव पारितटाकळघाट ग्रामपंचायतमध्ये १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी बसस्थानक आणि शौचालय बांधकाम करण्याबाबतचा ठराव मांडला. तो ठराव सदर ग्रामसभेत पारित झाला. परंतु तो ठराव पारित होऊन आता चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी त्यानंतर काय झाले, कळायला मार्ग नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल नाराजी आहे.लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्षहिंगणा तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून टाकळघाटची ओळख आहे. या गावाची गरज लक्षात घेता रमेश बंग यांच्या निधीतून प्रवासी निवारा बांधण्यात आला. त्यानंतर या मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व याच गावचे विजय घोडमारे यांनी केले. परंतु त्यांनी प्रवासी निवाऱ्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर विद्यमान आ. समीर मेघे यांच्याकडून ग्रामस्थांना आशा होती. मात्र त्यांच्याकडूनही बसस्थानकाबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाही. एवढेच काय याच गावातून जिल्हा परिषदेत रत्नमाला इरपाते, पंचायत समितीत उपसभापती म्हणून हरिश्चंद्र अवचट यांच्याकडे नेतृत्व सोपविले. मात्र त्यांच्याकडूनही नागरिकांची निराशाच झाली. परिणामी या बसस्थानकाला ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.