लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी येत्या ११ मार्चपर्यंत निर्णय घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सामान्य प्रशासन विभागाला दिला आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची नवीन ९५४ पदे रिक्त झाली होती. सामान्य प्रशासन विभागाने त्यापैकी १३८ पदे भरण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे न्यायालयाने उर्वरित ८१६ रिक्त पदे भरण्यासाठी हा आदेश दिला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अॅड. अनुप गिल्डा यांनी न्यायालय मित्र म्हणून, तर वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा व अॅड. दीपक ठाकरे यांनी राज्य सरकारतर्फे कामकाज पाहिले.
- राज्य सरकारने ३० जानेवारी व ४ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३८ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदी बढती दिली आहे. याशिवाय, वैद्यकीय शिक्षकांची रिक्त होणारी पदे तातडीने भरण्यासाठी दोन मंडळांची स्थापना केली आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक प्राध्यापकांची ४७९ रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नियुक्तीकरिता २९७उमेदवारांची नावे सरकारला पाठविण्यात आली आहेत.
- मेडिकल येथे कर्करोग रुग्णालय बांधकामासाठी सरकारने ७कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले आहेत.