भूपेश थूलकर : रिपाइं(आ.)तर्फे गुरुवारी राज्यभरात निषेध सभानागपूर : हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील दलित स्कॉलर रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया(आठवले)चे प्रदेश अध्यक्ष भूपेश थूलकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्यासह खासदार, केंद्रीय मंत्री दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राव यांनी वसतिगृहातून १० दलित विद्यार्थ्यांना बाहेर काढले होते. रोहित हा डॉ. आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा अध्यक्ष असल्याने राव यांनी त्याला वेळोवेळी प्रताडित करून आत्महत्येस बाध्य केले. यामुळे आंबेडकरी व ओबीसी जनतेत तीव्र असंतोष आहे. या घटनेच्या निषेधात व या प्रकरणातील दोषींवर क ठोर कारवाई व्हावी यासाठी रिपाइंतर्फे गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध सभा आयोजित करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणे तसेच वर्धा येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करून रोहित आत्महत्या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.दलितांवरील वाढत्या अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी दलित पँथरची समाजाला पुन्हा गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या संघटनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला प्रा. सुनील सुमन, संजीव चंदन, भीमराव बन्सोड, राजू बहादुरे, विनोद थूल, अशोक मेश्राम, राजेश ढेंगरे, मनोज मेश्राम, सतीश तांबे, राजीव सुमन, दादाकांत धनविजय आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रोहितच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करा
By admin | Published: January 21, 2016 2:35 AM