नागपूर : राज्यातील शिक्षण विभागातील वर्ग १ च्या १६ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती १६ डिसेंबरला करण्यात आल्या. या पदोन्नत्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व या प्रकरणात झालेल्या आर्थिक दुर्व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
गाणार यांनी लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले की, शिक्षण उपसंचालक गट ‘अ’ या पदावर पदोन्नतीचे आदेश निर्गमित करून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली आहे. १६ पैकी ७ अधिकारी दुसऱ्याच दिवशी रुजू झाले. त्यानंतर १८ डिसेंबरला पदोन्नतीबाबत ‘जैसे थे स्थिती’ ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतरसुद्धा काही अधिकारी पदोन्नतीच्या पदावर रुजू झाले. यावरून प्रशासनाचा गलथानपणा व बेजबाबदारपणा सिद्ध होतो. या अवमान प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर स्वरुपाची दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षण उपसंचालक व समकक्ष पदावर पदोन्नती देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्व्यवहार झाल्याच्या तक्रारी आहे. ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी प्रलंबित आहे. त्यांनासुद्धा पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.