लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळही मंगळवारी दिल्लीत दाखल झाले. शिष्टमंडळाने अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जनार्दन द्विवेदी, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, आॅस्कर फर्नांडिस, मधुसुदन मिस्त्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली.चतुर्वेदी दिल्ली येथे तळ ठोकून आहेत. त्यांनीही आपल्या समर्थकांना दिल्ली येथे बोलावून घेतले. समर्थकांनी नेत्यांच्या भेटी घेत आपली बाजू मांडली. तानाजी वनवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात कुणाल राऊत, यशवंत कुंभलकर, विजय बाभरे, दीपक कापसे, नगरसेवक कमलेश चौधरी, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, पुरुषोत्तम हजारे, मनोज गावंडे, प्रणिता शहाणे, राकेश निकोसे, अरुण डवरे, आयशा अन्सारी, शादाब खान, अनिल मछले, आमीर नुरी, धीरज पांडे, राजेश जरगर, बाबा वकील, राजू पाली, विजय वनवे, बाबा घोरपडे, नीरज चौबे यांच्यासह एकूण ५५ जाणाचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले.एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी बाहेरचे लोक पक्षात घेणे सुरू आहे तर दुसरीकडे पक्षातील सक्षम नेत्यांना कट रचून बाहेर काढले जात आहे. चतुर्वेदींवरील कारवाई योग्य नाही. त्यांना परत पक्षात घेण्यात यावे, अशी बाजू या शिष्टमंडळाने मांडली. सोबत नागपूर शहरातील संघटनेच्या निवडणुका थांबल्या आहेत. निरीक्षक पाठवून निवडणूक घेण्यात यावी. शहर अध्यक्ष पक्ष विरोधी कारवाया करीत आहे. पक्षाची बदनामी करीत आहेत. त्यांना पदमुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे तानाजी वनवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.