वाचनालय व अध्ययन कक्ष व्यवस्थापनाचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरामध्ये सुरू असलेल्या महापालिकेच्या वाचनालय व अध्ययन कक्षामध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर आवश्यक सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे वाचनालयांना अनुदान दिले जाते. नागपूर मनपाच्या सर्व वाचनालय व अध्ययन कक्षांना शासकीय अनुदान मिळावे, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी दिले.
मनपा मुख्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत वाचनालय व अध्ययन कक्षांचे संचालन व व्यवस्थापनाचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता अभय पोहेकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, सहायक आयुक्त गणेश राठोड, घनश्याम पंधरे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे आदी उपस्थित होते.
मनपाचे ३४ वाचनालय व ७७ अध्ययन कक्ष आहेत. यामधील काहींचे संचालन व व्यवस्थापन मनपा कर्मचाऱ्यांद्वारे केले जाते तर काहींचे बचत गटांकडे देण्यात आले आहे, अशी माहिती राधाकृष्णन बी. यांनी दिली. वाचनालय व अध्ययन कक्षांचे संचालन व व्यवस्थापन मनपाने स्वत:च करावे. या क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या संस्थांना ही जबाबदारी सोपवावी, भौतिक सुविधा उपलब्ध कराव्या असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. उत्तर नागपूरमध्ये डॉ. राममनोहर लोहिया व बाजीराव साखरे ई-ग्रंथालय हे दोन वाचनालये व अध्ययन कक्ष अद्ययावत करण्यात येणार आहे. राममनोहर लोहिया वाचनालय व अध्ययन कक्ष . बाजीराव साखरे वाचनालय व अध्ययन कक्ष अद्ययावत करण्याबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या. तसेच उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश ग्रंथालय, पाचपावली सिध्दार्थ अध्ययन कक्ष टेका, पंचशील वाचनालय बद्दल ही दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले.