शिक्षणाधिकारी यांना निवेदन
नागपूर : नाव मोठे दर्शन खोटे असे काम करणाऱ्या वाठोड्यातील नारायणा ई-टेक्नो स्कूलने शेकडो पालकांना गंडा घातला आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेबरोबरच पालकांना अंधारात ठेवून कोणत्याही प्रकारची मान्यता नसताना सर्रासपणे शाळा चालविणाऱ्या नारायणा ई-टेक्नो स्कूलवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना करण्यात आली. पक्षाचे नागपूर शहरप्रमुख राजेश बोढारे व शहर समन्वयक शबिना शेख यांच्या नेतृत्वात वंजारी यांना निवेदन देण्यात आले. या शाळेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला. यावेळी प्रमुख रूपाने उत्कर्ष गाडबैल, मनीष लुटे, उज्ज्वल समर्थ, आसिफ शेख, शुभम उघडे, स्वप्निल सेनाड आदी उपस्थित होते.