लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) नागपूर येथील फ्लाईंग क्लबद्वारे ‘महाज्योती’च्या लाभार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२१ ला करार केला होता. त्यानुसार २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीमार्फत प्रशिक्षण शुल्क नागपूर फ्लाईंग क्लब ला उपलब्ध करून दिले होते. सामंजस्य करारानुसार प्रशिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी ही नागपूर फ्लाईंग क्लब या संस्थेची होती. फ्लाईंग क्लब द्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न दिल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उंच आकाशात विमान उडविण्याचे स्वप्न भंग पावले असल्याने नागपूर फ्लाईंग क्लबवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी बुधवारी विधानसभेत केली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या वैमानिक प्रशिक्षण योजनेंतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण सत्र एप्रिल, २०२४ मध्ये पूर्ण झाले असून या सत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लबने आवश्यक असलेले २०० तासांचे पायलट प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने विद्याथ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या योजनेचे कंत्राट महाज्योतीद्वारे नागपूर फ्लाइंग क्लबला देण्यात आले होते. याकरिता प्रती प्रशिक्षणार्थी तब्बल २५ लाख रूपये प्रशिक्षण शुल्क महाज्योतीकडून फ्लाइंग क्लबला अदा करण्यात आले असून प्रशिक्षणार्थीना १० हजार रूपये प्रती महिना विद्यावेतनाची ही तरतूद केली गेली.
फ्लाइंग क्लबकडून पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले २०० तासांचे विमान उड्डाण प्रशिक्षण अद्याप सुरूच झाले नाही, तसेच या विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक तसेच, शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षणासह विद्यावेतन सुरू करावे, अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी शासनाला केली.