नागपूर : नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही तळीरामांवर कुठलाही परिणाम पडल्याचे दिसून आले नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी शहरात राबविलेल्या ‘ड्रंकन ड्राईव्ह’मोहिमेंतर्गत दोनशेवर तळीरामांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली अनेक जण उन्माद घालतात. दारू पिऊन वाहन चालवितात, यातून अपघात घडतात. यावर नियंत्रण राहावे, या उद्देशाने वाहतूक पोलीस विभागातर्फे शनिवारी सायंकाळपासूनच शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. चौकाचौकात पोलीस तैनात होते. ब्रिथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी विशेष आदेश जारी करीत दारू पिऊन वाहन चालवताना कुणी आढळून आल्यास त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतरही तळीरामांवर कुठलाही परिणाम झाला नाही. शहरात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दोनशेवर तळीरामांविरुद्ध कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी) फुटाळा तलावावर श्वान पथक शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर फुटाळा तलाव येथे मोठ्या प्रमाणावर नववर्षासाठी गर्दी होत असल्याने, येथे विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्वान पथक तैनात करण्यात आले होते.
दोनशेवर तळीरामांवर कारवाई
By admin | Published: January 01, 2017 2:54 AM