लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याचे आवाहन केले जात असताना शहरात प्रसाधनगृहांची संख्या तोकडी आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी विविध गदीर्ची ठिकाणे, बाजार, चौक किंवा अन्य ठिकाणी प्रसाधनगृहांची निर्मिती होणे आवश्यक आहे. यातून नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल. यासाठी झोनस्तरावर जागेची उपलब्धता आणि त्यातील अडथळे दूर करून प्रसाधनगृहांच्या निर्मितीसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी दिले. नागरिकांच्या सुविधेकरिता झोननिहाय सुलभ शौचालय बांधकामाचे प्रस्ताव जागेच्या मालकीसह तयार करून त्याचीअंमलबजावणीबाबत करण्यासंदर्भात महापौर कक्षात संदीप जोशी यांनी बैठक घेतली. उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अविनाश बाराहाते, धनंजय मेंढुलकर, विजय गुरूबक्षानी, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
शहरात प्रसाधनगृहांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होते. याकरिता शहरात सुलभ शौचालयांची संख्या वाढविण्यावर मनपाचा भर आहे. आवश्यक त्या सर्वच ठिकाणी सुलभ शौचालय तयार करण्यात येणार आहेत. यासाठी ५ कोटी निधी राखीव ठेवण्यात यावा, सुलभ शौचालय निर्मितीचे कार्य लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी कार्यवाही करा असे निर्देश संदीप जोशी यांनी दिले.