लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. या आदेशामुळे शिकवणी वर्गांची जबाबदारी वाढली आहे.अल्पवयीनांना ५० सीसीवरील दुचाकी चालविण्याची परवानगी नाही. परंतु, हा नियम कागदावरच आहे. अल्पवयीन मुले-मुली सर्रास शक्तिशाली दुचाकी चालवीत आहेत. २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलाने शक्तिशाली दुचाकी निष्काळजीपणे चालवून दुसऱ्याचा अपघात केला होता. न्यायालयाने त्या घटनेची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली. ही याचिका बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आली होती. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरील आदेश दिला.याशिवाय न्यायालयाने शहरातील पार्किंग, वाहतूक कोंडी व अन्य समस्यांवर आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीला फटकारले. समिती बैठका घेऊन समस्या सोडविण्यावर विविध निर्णय घेते, पण त्यावर अंमलबजावणी केली जात नाही. निर्णय कागदावरच राहतात, असे मत न्यायालयाने व्यक्त करून आतापर्यंतच्या बैठकांमध्ये सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांवर सहा आठवड्यांत अंमलबजावणी करण्याचा आदेश उपसमितीला दिला. न्यायालयाने अन्य एका प्रकरणात शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्या समितीने स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. या प्रकरणात अॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.
विद्यार्थ्यांकडून वय व दुचाकीचे प्रतिज्ञापत्र घ्या; शिकवणी वर्गांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:59 AM
शिकवणी वर्ग संचालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे वय किती आहे व ते कोणती दुचाकी चालविणार आहेत याची माहिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र घ्यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला.
ठळक मुद्देशिकवणी वर्ग संचालकांची जबाबदारी वाढली