नागपूर : रनिंग स्टाफला रेल्वेच्या पाठीचा कणा समजण्यात येते. तरीसुद्धा रेल्वे प्रशासन रनिंग स्टाफवर तुघलकी निर्णय लादत असून रनिंग स्टाफला होत असलेला त्रास दूर करा, अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने आयोजित द्वारसभेत करण्यात आली.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील लोकोपायलट आणि गार्ड लॉबीसमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. द्वारसभेला संघटनेचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव जी. एम. शर्मा, मुख्यालय उपाध्यक्ष बंडू रंधई यांची प्रमुख उपस्थिती होती. द्वारसभेत रनिंग स्टाफचे मोबाईल बंद ठेवणे, स्पीडोमीटर ग्राफ पाहून रनिंग स्टाफला त्रास देणे, सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्यास रनिंग स्टाफला नोकरीवरून काढून टाकणे, या बाबींकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी विभागीय संघटक सी. पी. सिंह, बब्बू डागोर, ओ. पी. शर्मा, पी. एन. तांती, के. पी. सिंह, बी. एस. ताकसांडे, मनोहर आगुतले, एस. के. दत्ता, वाय. डब्ल्यू. गोपाल आणि संघटनेचे कर्मचारी, रनिंग स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.
...............