लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्यासाठी गुरुवारी रविभवन येथे त्यांची भेट घेऊन मराठाआंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासनाकडे केली. शिष्टमंडळात राज्य समन्वयक आबासाहेब पाटील व रमेश केरे पाटील यांचा समावेश होता.मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधव आणि भगिनींवर विनाकारण केसेस दाखल झालेल्या आहेत. यसंबंधात सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील परळी या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने जे ठिय्या आंदोलन झाले होते, त्या दरम्यान मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले होते. ते सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली होती. याबाबत पोलीसमहासंचालकांसोबतच बैठक सुद्धा झाली होती. यामध्ये कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे न्यायालय, पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्याकडे कायदेशीरबाबी कशा पूर्ण केल्या जातील आणि मराठा तरुण व भगिनींवरील गुन्हे कोणत्या पद्धतीने मागे घेतले जातील याबाबत सविस्तर चर्चा करून अॅड. निकम यांचा सल्ला घेण्यात आला.