लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिहान’ प्रकल्पात अनेक उद्योगांना दिलेल्या जमिनींवर काम सुरू झालेले नाही. शिवाय ‘लॉजिस्टिक पार्क’देखील दुसरीकडे हलविण्यात येत आहे. ज्या उद्योगसमूहांनी अद्यापही जमिनीवर बांधकाम सुरू केलेले नाही, त्यांच्याकडून जमिनी परत घेऊन त्यांचे वाटप लहान उद्योजकांना करण्यात यावे, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
धीरूभाई अंबानी रिलायन्स एअरोस्पेस पार्क (डीआरएल) साठी १२६ एकर जागा घेण्यात आली होती व केवळ दोन एकर जागेवरच कामकाज सुरू झाले आहे. पतंजली कंपनीच्या फूड पार्कसाठी मिहानमध्ये जागा देण्यात आली होती. मात्र त्यांचे कामदेखील सुरू झालेले नाही. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी मिहानमध्ये जागा घेतली आहे; मात्र अद्याप काम सुरू केलेले नाही. काम चालू न करणाऱ्या उद्योगांच्या जमिनी परत घेत त्यांनी शासनाकडे जमा केलेले शुल्क परत करू नये. ‘मिहान’मध्ये उद्योगवाढीस चालना देणे गरजेचे आहे. मात्र ‘एमएडीसी’च्या एकाही अधिकाऱ्याने विकासाकडे लक्ष दिले नाही. ‘मिहान’च्या प्रकल्पाला गती देण्यासाठी ‘आयएएस’ अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असून, त्यादृष्टीने सरकारने पावले उचलावी, अशी मागणी या पत्रातून तुमाने यांनी केली आहे.