लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात. देशाच्या विविध भागातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सुविधा उपलब्ध कराव्यात, दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश शनिवारी महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी दिले.मंगळवारी ८ ऑक्टोबरला होणाऱ्या ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समारंभाबाबत दीक्षाभूमीवर मनपातर्फे पुरविण्यात येणाऱ्या आवश्यक सुविधांचा अभिजित बांगर व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, धनंजय मेंढुलकर, ए.एस.मानकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, एन.आर.सुटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.प्रारंभी आयुक्तांनी दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महिला व पुरुषांसाठी निर्माण करण्यात येत असलेली प्रसाधनगृहे, दीक्षाभूमी परिसरातील तयारीची पाहणी केली. आवश्यक दुरुस्त्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. लाखो अनुयायांच्या सुविधेसाठी कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जॅकेट, हॅण्डग्लोज, मास्क आदी सुरक्षा साहित्य वापरूनच कार्य करावे. देखरेखीसाठी प्रभारींची नियुक्ती करण्यात यावी. तात्पुरत्या प्रसाधनगृहांमध्ये नेहमी स्वच्छता राहावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करणे तसेच दुर्गंधी पसरू नये यासाठी आवश्यक फवारणी करण्याचे निर्देश दिले.आरोग्य सुविधेसाठी मनपा व शासनाच्या रुग्णवाहिका सेवेत तैनात ठेवा, वैद्यकीय सुविधांच्या स्टॉल्सवर आवश्यक औषधांचा पुरवठा करा, सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्याचेही निर्देश बांगर यांनी दिले. नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविल्या जाव्यात यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये मनपाचे उपद्रव शोध पथकही तैनात राहणार आहे. स्वच्छतेसह नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
स्वच्छता आणि सुरक्षेची खबरदारी घ्या : अभिजित बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:18 AM
दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश शनिवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा आढावा