लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाबा (अन आईदेखील) सिंघमच आहे. मात्र, कोरोना भेकड आहे. तो लपून आक्रमण करतो. त्यामुळे आम्हाला सारखी धाकधूक वाटते... ही भावना आहे पोलिसांच्या मुलांच्या मनात! उन्हाच्या तडाख्यात पोलीस कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत. मात्र, त्यांच्या मुलांच्या मनात कोरोनाची भीती घर करून बसली आहे. त्यांना पोलीस दलात सेवारत असलेल्या आपल्या आई आणि बाबांची खूप काळजी वाटते. मुलांनाच नव्हे तर पोलिसांच्या कुटुंबीयांनाही आपल्या ‘सिंघम’ ला कोरोनाची बाधा होऊ नये, असे वाटते. त्यासाठी पोलिसांचे कुटुंबीय मनोमन प्रार्थना करीत असल्याचे दिसून येते.
कोरोना वारियर्स म्हणून अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचे मनोबल जबरदस्त आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना खास करून मुलांना चिंताग्रस्त केले आहे. कोरोनाचा नायनाट होईपर्यंत या मुलांची अवस्था अशीच राहील, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. अनेक पोलिसांनी आपल्या कुटुंबीयांना स्वतःपासून दूर ठेवले आहे. त्यांच्या मुलांची भावना तर शब्दातीत आहे.
लसीकरण
शहर पोलीस दलात आठ हजार पोलीस सेवारत आहेत. यातील ६२२३ अर्थात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पोलिसांनी पहिल्या टप्प्यात लस घेतली असून
दुसऱ्या टप्प्याचे लसीकरणही सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात मार्च अखेर पर्यंत २१ टक्के पोलिसांचे लसीकरण झाले आहे. ही टक्केवारी झपाट्याने वाढणार आहे.
यावर्षी दोन पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला. एकूणच कोरोनाशी सामना करताना पोलिसांनी चांगले नियंत्रण मिळवले आहे.
ठिकठिकाणी उपचार सुरू
शहरात गेल्या तीन महिन्यात २८८ पोलीस आणि त्यांचे ३८५ नातेवाईक कोरोनाबाधित झाले. त्यांच्यातील काहींवर पोलीस हॉस्पिटल, काहींवर खासगी हॉस्पिटल तर काहींवर घरीच उपचार सुरू आहेत.
अनन्या आणि अवनी तृप्ती मोरे
आई आम्हाला टाळते!
अनन्या आणि अवनी या जुळ्या बहिणी. त्यांची आई तृप्ती सोनवणे जरीपटका पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आपल्या मुलींना पुण्याला ठेवले आहे. या दोघी चिमुकल्या आपल्या आईला फोन करून सर्वात आधी प्रश्न करतात... आई तू ठीक आहे ना...?
आई त्यांना टाळते, हे त्यांच्या लक्षात आले आहे. आईच्या भेटीची ओढ आहेच. ती कोरोनापासून दूर रहावी, असे अनन्या आणि अवनीला वाटते.
सांची हेमंत खराबे
बाबांची सारखी चिंता वाटते
बाबा कुणाला घाबरत नाहीत, मी पण घाबरत नाही. परंतु गेल्या वर्षी बाबांना आणि नंतर आई तसेच दादाला कोरोना झाला. त्यावेळी खूप खराब अवस्था झाली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा कोरोना होऊ नये, असे सारखे वाटते. ते कर्तव्यावर असताना सारे विसरतात. वेळेवर जेवणे खाणे करत नाही. दुखण्याकडेही दुर्लक्ष करतात. रात्रंदिवस धावपळ करतात. त्यामुळे त्यांची सारखी चिंता वाटते.
स्वरीत अनिल जिट्टावार
मला त्यांची खूप काळजी वाटते
बाबांनी आपले कर्तव्य पार पाडताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. ते सकाळी घरून निघतात आणि लवकर घरी परत येत नाहीत. मी त्यांची खूप वाट बघत असतो. त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. ती पार पाडताना त्यांना काही होणार नाही, असा विश्वास आहे. तरीपण मला त्यांची खूप काळजी वाटते.
त्यामुळे धोका कमी!
लसीकरणामुळे पोलिसांचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. त्यामुळे बाधा होण्याचा धोका कमी झाला आहे.
- डॉ. संदीप शिंदे
पोलीस हॉस्पिटल, नागपूर.
---