लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - माझी हात जोडून विनंती आहे - दौरे सांभाळून करा, स्वत:ला सांभाळा, कार्यकर्त्यांना जपा. पक्षाचे आधीच अनेक कार्यकर्ते आपण गमावले आहेत. आता आणखी गमावणे पक्षालाही परवडणारे नाही, अशा शब्दांत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना वडीलकीचा सल्ला दिला आहे.
शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप करताना नितीन गडकरी यांनी हा सल्ला देताना, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आवर्जून उल्लेख केला. कार्यकर्ते जीव धोक्यात घालून मदत करीत असल्याबद्दल कौतुक करतानाच, नेते व कार्यकर्त्यांनी संकटकाळात घ्यावयाच्या काळजीबद्दल ते आत्मीयतेने बोलले. देवेंद्रजी आपण मध्यंतरी गडचिरोलीचा दौरा केला. असे दौरे करताना गाडीत किती लोक आहेत, याची काळजी घ्या. असा आढावा, रस्ते-पुलाची उदघाटने व्हिडीओद्वारेही करता येतील, असे गडकरी म्हणाले.
नागपूर शहरातील कोरोना स्थिती तसेच त्यापश्चात होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल ते तपशिलात बोलले. विदर्भातील विविध संस्थांना केलेल्या मदतीची माहितीही दिली.
या संकटकाळात आधी स्वत:चा परिवार, कुटुंबाची आर्थिक व्यवस्था, मग समाज, पक्ष, लोकांना मदत असा कामांचा क्रमही गडकरी यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आखून दिला.
---------------
सत्ताकारण म्हणजे राजकारण नव्हे
साध्या साध्या मदतीचेही राजकीय श्रेय घेण्याची गरज नाही, अशा आशयाचा गडकरी यांचा सल्ला शनिवारी रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोर्ड, झेंडे नकोत, अशा कानपिचक्या दिल्याच्या प्रतिक्रिया आहेत. प्रत्यक्षात गडकरी म्हणाले, की आपण जे करतो, ते लोकांना माहीत असते. सेवाकामाचा बागुलबुवा नको. राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे, तर समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण म्हणजे राजकारण, असे गडकरी यावेळी म्हणाले.
-----------------