लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनि आणि बुधनंतर आपल्या सूर्यमालेतील सर्वात माेठा आणि आकर्षक ग्रह म्हणून ओळख असलेला गुरु १९ आणि २० ऑगस्टला पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. सूर्याभाेवती फिरताना गुरु या दाेन दिवशी सूर्यापासून बराेबर विरुद्ध दिशेला पाेहोचत असून, त्यामध्ये आपली पृथ्वी आल्याने ताे जवळ आला आहे. या दिवशी पृथ्वीपासून गुरु ग्रह ५८८ दशलक्ष किलाेमीटर अंतरावर असणार आहे. (Take a closer look at the Jupiter today and tomorrow )
सूर्याभाेवती लंबगाेलाकार (एलिप्टीकल) गतीने फिरताना सर्व ग्रह कधी जवळ, तर कधी दूर जात असतात. पृथ्वीला ज्याप्रमाणे सूर्याभाेवती फिरण्यास ३६५ दिवस लागतात तसेच गुरु ग्रहाला १२ वर्षे लागतात. सध्या गुरु ग्रह सूर्यापासून बराेबर विरुद्ध टाेकावर आहे. सूर्यापासून त्याचे अंतर ८१७ दशलक्ष किमी एवढे आहे व यालाच ‘अपाेझिशन’ असे संबाेधले जाते. आपली पृथ्वी या दाेघांच्या अगदी मधे आली आहे, म्हणजे सूर्य, पृथ्वी व गुरु हे समांतर रेषेत आहेत. तशी आपली पृथ्वी १२ वर्षांपर्यंत दरवर्षी या दाेघांच्या मधे येत असते. पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ला २६ सप्टेंबर राेजी ताे यावर्षीपेक्षा जवळ म्हणजे ५९ काेटी ६० लक्ष किमीवर असणार आहे. सर्वाधिक दूर गेल्यानंतर या दाेन्ही ग्रहांचे अंतर ९६८ दशलक्ष किमी एवढे असते.
१९ ऑगस्ट राेजी पश्चिमेकडे सूर्य मावळल्यानंतर पूर्वेकडे गुरु ग्रह तेजस्वीपणे दिसून येईल. रात्री ८ नंतर ताे अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. त्यानंतर रात्रभर ताे तुम्ही उघड्या डाेळ्यांनी पाहू शकता. २० ऑगस्टलाही त्याचे असेच दर्शन हाेईल. शक्तिशाली दुर्बिणीने ग्रहाकडे पाहिल्यास त्याचे ‘गॅनिमिट, आयाे, युराेपा, कॅलिस्टाे’ हे चार चंद्राचे स्पष्ट निरीक्षण तुम्ही करू शकता. गुरु हा सूर्यानंतरचा पाचवा ग्रह असून, त्याचे वजन पृथ्वीच्या ३१८ पट अधिक आणि आकारमान १३२० पट माेठे आहे. मुख्यत्वे हायड्राेजन व हेलियमने तयार गुरु सूर्यमालेतील सर्व ग्रहांपेक्षा ताे २.५ पट अधिक वजनदार आहे.
शनि व गुरुसाेबत चंद्राचा संयाेग
येत्या दाेन दिवसात आपल्या चंद्राचाही शनि आणि गुरु या दाेन ग्रहांशी संयाेजन हाेणार आहे. २० ऑगस्टला चंद्राचे शनि ग्रहासाेबत संयाेजन हाेणार आहे, तर २२ ऑगस्टला गुरु साेबत हे संयाेजन हाेणार आहे. तसेच सध्या चंद्राचे मंगळ, बुध या ग्रहांशी संयाेजन घडून गेले आहे.