लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत अभियंत्यांनी शिविगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सभेनंतर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. मी शेडेकर असे लिहिलेल्या टोप्या अभियंत्यांनी घातल्या. यावेळी बोलताना कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांनी अभियंत्यांनी अशा प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मुख्य अभियंता उल्हास देबडवार म्हणाले, कमी वेळात सूचना देऊनही सर्व अभियंता उपस्थित झाले ही चांगली बाब आहे. भविष्यात अशीच एकता राहिल्यास सर्वांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण होईल. कोणताही शासकीय कर्मचारी असो त्यास संरक्षण मिळणे आवश्यक असून अशा प्रसंगी सर्वांनी तुटून पडले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. निषेध सभेनंतर अभियंत्यांनी कार्यालयाबाहेर येऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत नारेबाजी केली. यावेळी राजपत्रित अभियंता संघटना महाराष्ट्रचे अविनाश गुल्हाने, राजदत्त अलोने, मुकुल देशकर, कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष संजय नंदनवार, संजय भोगे, योगेश निंबुळकर, राजेश जाजुलवार यांच्यासह अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियंत्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : नागपुरात अभियंत्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 9:32 PM
आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत अभियंत्यांनी शिविगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सभेनंतर पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
ठळक मुद्देपालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन