बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या - विजय वडेट्टीवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन
By कमलेश वानखेडे | Published: December 5, 2023 04:49 PM2023-12-05T16:49:57+5:302023-12-05T16:50:19+5:30
वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे.
नागपूर : अमेरिका सारख्या देशाने ईव्हीएम बंद केले आहे. भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. उद्धव ठाकरे म्हणाले तसा प्रयोग झाला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले.
वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पाटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मातांनी निवडून येतो. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
शासन आपल्या दारीसाठी सरकारी तिजोरीतून खर्च
शासकीय पातळीवर प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोक मंत्रालयात येतात. मंत्रालयापुढे मोठी रांग लागते. मात्र, आता मंत्रालयात प्रवेश नाकारला जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे प्रश्न सुटत नाहीत तर मग शासन आपल्या दारी कार्यक्रम का घेता ? शासनाच्या तिजोरीतीन खर्च करून हे मेळावे घेणे सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.